सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना अजित पवारांच्या बंडखोरीविषयी भाष्य केले आहे. अजित पवारांना यापुढे गद्दार म्हणणार का या प्रश्नावर उत्तर देताना सुप्रिया सुळे…
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. पाठिंबा जाहीर केल्यानंतर काही वेळातच अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनील तटकरे यांच्यासह इतरही नेत्यांनी काल मंत्री पदाची शपथ घेतली. महाराष्ट्र सत्तासंघर्षाचा भाग तीन सुरु झाल्यापासून अनेक नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. अशातच सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना अजित पवारांच्या बंडखोरीविषयी भाष्य केले आहे. अजित पवारांना यापुढे गद्दार म्हणणार का या प्रश्नावर उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यावर विरोधकांनी ५० खोके, गद्दार अशा उपाध्यांनी शिंदे व त्यांच्यासह गेलेल्या आमदारांवर टीका केली होती. तर आता अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसह शिंदे- फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याने त्यांनाही गद्दार म्हटले जाणार का असे प्रश्न अनेकजण करत आहेत. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. २०१९ ते २३ या चार वर्षात आता माझ्यावरही थोडी जबाबदारी आणि मॅच्युरिटी आली आहे. आपलं प्रोफेशनल काम व नाती यांच्यात गल्लत करायची नाही हे मला माहित आहे.”
“माझं आणि दादाच भांडण होऊच शकत नाही कारण दादाविषयी माझ्या मनात प्रेमच होतं आणि राहील, दादा माझा मोठा भाऊ आहे, इतक्या वर्षात मी त्याच्याशी कधी वाद घातला नाही आणि कधी घालणारही नाही जेव्हा आमच्या नात्याचा विषय असेल तेव्हा. बाकी जेव्हा पक्षाचा विषय असेल तेव्हा ते आमचं प्रोफेशनल काम आहे. त्यात मी पर्सनल व प्रोफेशनल गल्लत करणार नाही. बाकी पुढे काय होईल ते बघू ही काही इन्स्टंट कॉफी नाही.”
दरम्यान, अजित पवार यांच्या बंडानंतर काल सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांचा एक व्हिडीओ पोस्ट करून प्रेरणादायी असे एका शब्दाचे कॅप्शन दिले होते. तर शरद पवार यांनी आता स्वतः राष्ट्रवादीतील आश्वासक चेहरा म्हणून लोकांपर्यंत पोहोचणार असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.