पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण YCM रुग्णालय येथे अंधश्रध्देला खतपाणी घालण्यात येत आहे.महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असताना देखील या कायद्याला न जुमानता महानगरपालिकेच्या शासकीय रुग्णालयात अंधश्रद्धा पसरवण्याचे व गरीब रुग्णांना लुटण्याचे काम खुलेआम चालू आहे.
YCM रुग्णालयात तंत्र मंत्राद्वारे रुग्णांना ठीक करण्याचा दावा केला जातो त्याबदल्यात गरीब रुग्णांकडून पैसे घेतले जातात. समाज माध्यमात सध्या एक व्हिडीओ फिरत असून त्यामध्ये एक व्यक्ती एका रुग्णाच्या डोक्यावर हात ठेऊन कसले तरी मंत्र म्हणत असल्याचे दिसत आहे. रुग्णालयात इतके सुरक्षारक्षक व कर्मचारी, डॉक्टर असताना या चुकीच्या प्रकाराला रोखण्याचा कोणीही प्रयत्न करताना दिसत नाही यावरून हा सगळं प्रकार ycm प्रशासनाच्या आशीर्वादाने चालू आहे की काय असा प्रश्न पडतो.
अश्या प्रकारे पुरोगामी महाराष्ट्रात व स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेच्या शासकीय रुग्णालयात असे चुकीचे प्रकार घडत आहे व असे करणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची भीती नाही. याप्रकरणी महानगरपालिकेचे आयुक्त मा.शेखर सिंह व पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे साहेब यांना रयत विद्यार्थी विचार मंचा तर्फे निवेदन दिले असून व्हिडिओ मध्ये दिसणाऱ्या सदर व्यक्तीवर व त्याला पाठीशी घालणाऱ्या YCM प्रशासनावर अंधश्रद्धा निर्मुलन कायद्या अंतर्गत कारवाईची मागणी रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे प्रदेश महासचिव संतोष शिंदे यांच्या वतीने करण्यात आली आहे..