युवती, महिला आणि लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी लॉलीपॉप इंटरटेनमेंट आणि कॅलिस्टा पेजेंट या संस्थांच्या वतीने मागील चार वर्षांपासून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या अंतर्गत रविवारी (३ मार्च) ‘महाराष्ट्राची सौंदर्यवती मेगा शो २०२४ स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संचालक संजीव जोग यांनी प्रसिद्धीस दिली आहे. रविवारी दुपारी बारा वाजता इल्प्रो सिटी स्क्वेअर, तिसरा मजला, चिंचवड येथे सुरू होणाऱ्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर ज्येष्ठ नेते संजोग वाघेरे पाटील, डॉ. प्रशांत इनरकर, ज्येष्ठ कर सल्लागार शाळीग्राम तायडे, नृत्यांगना संयोगिता पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र प्राइड पुरस्कार वितरण सोहळा, सौंदर्यवती स्पर्धेचे पारितोषिक वितरण आणि www.calistapageants.com या वेबसाईटचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या स्पर्धेत लहान मुलांना प्रथम पारितोषिक रोख रक्कम दहा हजार रुपये आणि मुकुट, द्वितीय सात हजार रुपये, मुकुट आणि तृतीय क्रमांकासाठी पाच हजार रुपये आणि मुकुट बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच सहभागी सर्व लहान स्पर्धकांना स्मार्ट वॉच, ड्रॉइंग टॅबलेट आणि आकर्षक भेट वस्तू देण्यात येणार आहे.
युवती आणि महिलांच्या गटात प्रथम पारितोषिक रोख रक्कम १५ हजार रुपये, मुकुट, द्वितीय १२ हजार रुपये, मुकुट आणि तृतीय दहा हजार रुपये आणि मुकुट बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी झालेले सर्व युवती आणि महिलांना सोन्याची नथ, पैठणी आणि मुकुट देण्यात येणार आहे. डॉ. प्रशांत इनरकर, डॉ. दुर्गा लाडके, मिस इंडिया विजेती नैना वेदपाठक, मेघना भालेराव, डॉ. शुभम अगाटे हे परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.