ब्लॅक हॉर्स मोशन पिक्चर्स प्रथमच चित्रपट निर्मिती मध्ये पदार्पण करत असून पदार्पणातच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कथेवर आधारीत सुलतान या मराठी लघुपटाची नुकतीच घोषणा केली . काल नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दिनांक १ जानेवारी २०२३ राजी या लघुपटाचे पोस्टर आणि टायटल सोशल मीडियावर प्रदर्शित केले आहे. यामध्ये सुलतानच्या प्रमुख भूमिकेत अभिनेता अनिल नगरकर असून अनिल नगरकर प्रथमच एका वेगळ्या धाटणीची भूमिका साकारत आहेत, याशिवाय नाळ , घर बंदुक बिर्याणी या चित्रपटात भूमिका केलेले अभिनेते गणेश देशमुख तसेच कस्तुरी, म्होरक्या , वाय या चित्रपटात भूमिका केलेले अभिनेते अनिल कांबळे आणि अजय साठे ,प्रशांत रुईकर, श्रीकांत गायकवाड , तानाजी साठे , एकनाथ गालफाडे ,रणजित सराटे आदी अभिनय करत आहेत. तसेच छायाचित्रण अभिजीत घुले तर संकलन प्रदीप पाटोळे हे करत आहेत.
सुलतान या लघुचित्रपटाचं दिग्दर्शन अविनाश कांबीकर करत असून त्यांनी यापूर्वी विविध व्यवसायिक जाहिरातीचे दिग्दर्शन केलेले आहे.सुलतान या लघुपटाच्या माध्यमातून ते प्रथमच एका ऐतिहासिक विषयावर लघुपटाचे दिग्दर्शन करत आहेत. अण्णा भाऊ साठे यांची सुलतान हि कथा भारतासह रशियात प्रचंड गाजलेली आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रखर लेखणीतून साकारलेलं सामान्य माणसाचं जगण्याच मुल्य या लघुचित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा मी प्रयत्न केला असून ह्यावर काम करताना प्रचंड दबाव होता. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची नुकतीच जन्मशताब्दी साजरी झाली असून त्यांनाही या माध्यमातून आदरांजली वाहण्याची मला संधी मिळाली या बद्दल मी ब्लॅक हॉर्स मोशन पिक्चर्स आणि सहनिर्माते विजय क्षिरसागर यांचा खूप आभारी आहे असे दिग्दर्शक अविनाश कांबीकर म्हणाले.
नुकतंच सुलतान या लघुचित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं, यामध्ये अभिनेते अनिल नगरकर यांची भेदक नजर आणि पोस्टरवरील ह्या ओळी ” विद्रोह आणि बंडाच्या मार्गावर वाटचाल केल्याशिवाय क्रांती होत नाही…! ” प्रेक्षकांना चांगलच पसंत पडत आहेत.