सोशल मीडियावर अनेक रमी गेमचे ॲप असून तुम्ही हा गेम खेळल्यावर लाखो रुपये जिंकला असे आमिष दाखविले जाते. या आमिषाला बळी पडून अनेकजण गेम खेळतात आणि लाखो रुपयांची फसवणूक झाल्याच्या घटना घडत आहे. पुण्यातील औंध भागातील एका नोकराने ऑनलाईन रमी खेळण्यासाठी मालकाच्या घरातून तब्बल ३८ लांखाची चोरी केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मनीष रॉय असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.
चतु:श्रुंगी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ निरीक्षक बालाजी पांढरे म्हणाले की, आरोपी मनीष रॉय हा मूळचा पश्चिम बंगालमधील रहिवासी आहे. तो औंध भागातील त्र्यंबकराव पाटील यांच्या घरी नोकर म्हणून काम करीत होता. आरोपी मनीष याला चांगला पगारदेखील होता. पण त्याला ऑनलाईन रमी खेळण्याचे व्यसन लागले होते. आरोपी मनीषला ऑनलाईन रमी गेममधून चांगले पैसे मिळाले. त्यामुळे त्याने मोठ्या रकमेच्या गेम खेळण्यास सुरुवात केली. त्यामध्ये जवळपास २३ लाख रुपये हरल्याने, मालक त्र्यंबकराव पाटील यांच्या घरातच चोरी करण्याचे ठरवले. त्यानुसार त्याने तब्बल ५५ तोळे सोने आणि ११ लाख रोख रक्कम अशी एकूण ३८ लाखांची चोर केल्याची घटना घडली आहे. त्या घटनेची तक्रार आमच्याकडे येताच काही तासांत आरोपी मनीष रॉय याला जेरबंद करण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले.