पिंपरी चिंचवड येथे अनुसूचित जाती उपवर्गीकरण या महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील विषयाला व्यापक जनाधार मिळत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. सामाजिक न्यायाच्या दिशेने सुरू असलेल्या या चळवळीच्या पार्श्वभूमीवर आज शहरात विविध समाजघटकांची अभ्यासपूर्ण आणि दिशा ठरवणारी बैठक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकावर पार पडली.
या बैठकीस सुमारे 200 – 300 प्रतिनिधी विविध समाजातून मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थिती केवळ संख्यात्मक न राहता सामाजिक जाणीव, अस्मिता आणि न्यायाच्या लढ्याची तीव्रता दर्शवणारी ठरली.
बैठकीत अनुसूचित जाती उपवर्गीकरण हा केवळ धोरणात्मक विषय नसून सामाजिक समतेचा, हक्कांच्या न्याय्य पुनर्वाटपाचा आणि ऐतिहासिक अन्याय दूर करण्याचा मूलभूत प्रश्न असल्याचे ठामपणे मांडण्यात आले. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरक्षणाचा लाभ पोहोचवण्यासाठी उपवर्गीकरण अपरिहार्य असल्याचा एकमुखी सूर उमटला.
विशेषतः चर्मकार, वाल्मिकी आणि मादीगा समाजाने अत्यंत ठाम भूमिका घेत या मागणीला जोरदार पाठिंबा दर्शवला. “आरक्षणातील समानता नव्हे, तर न्याय्य वाटप हा आमचा घटनात्मक अधिकार आहे,” असा स्पष्ट संदेश बैठकीतून देण्यात आला.
या बैठकीस विधानपरिषद आमदार अमित गोरखे उपस्थित होते. त्यांनी या विषयावर सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे सांगत चळवळीला पाठिंबा दर्शवला.
बैठकीत भाऊसाहेब आडागळे, संदिपान झोंबाडे, अरुण जोगदंड, युवराज दाखले, मारुती जाधव, भगवान शिंदे, बाबू पाटोळे, संजय ससाणे, अण्णासाहेब कसबे, संजय धुतडमल, चंद्रकांत लोंढे, अविनाश कांबीकर, अविनाश शिंदे, डी. पी. खंडाळे, नाना कसबे, अनिल गायकवाड, निलेश गायकवाड, आनंद कांबळे, विशाल कसबे, नितीन घोलप, शंकर खवळे, सुनील भिसे, राजू आवळे, धीरज सकट, सविता आव्हाड, कविता बोराडे, अमोल कुचेकर, अश्विनी जाधव, हिरामण खवळे, गणेश लोंढे, अक्षय उदगिरे, सनी गवई, मारुती सोनटक्के, अण्णा लोखंडे, विठ्ठल शिंदे, स्वप्नील वाघमारे, अमोल खंडागळे आदी मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती.
या बैठकीतून विविध समाजांमध्ये निर्माण झालेली एकजूट, समन्वय आणि लढाऊ भूमिका ही चळवळीची सर्वात मोठी ताकद असल्याचे स्पष्ट झाले. ही बैठक केवळ चर्चेपुरती मर्यादित न राहता आगामी व्यापक आंदोलनाची नांदी ठरणार असल्याचे मत उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आले.
पिंपरी चिंचवडमधून उमटलेला हा ठाम आणि एकसंघ आवाज राज्याच्या सामाजिक धोरणांवर प्रभाव टाकेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


