पुणे व पिंपरी शहराबरोबरच जिल्ह्यात सात दिवसांसाठी कडक निर्बंध लादत हॉटेल, रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयावर हॉटेल व्यावसायिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मागील वर्षी कोरोना लॉकडाऊनमुळे आधीच या व्यावसायाला कठीण समस्यांना सामोरे जावे लागले आहे. पण नवीन वर्षात कुठे व्यावसायाचा गाडा रूळावर येत होता तर पुन्हा कोरोनाचा बागुलबुवा करून हॉटेल व्यावसायिकांना वेठीस धरण्याचा प्रकार या सरकारकडून केला जात असल्याची भावना यावेळी रेस्टॉरंट चालकांनी व्यक्त केली.
प्रशासनाच्या या निर्णयामुळे रेस्टाॅरंट धारकांना प्रचंड मनस्ताप होत आहे, आता कुठे व्यवसाय नीट सुरू होत असताना पुन्हा निर्बंध लादून हॉटेल व्यावसायिकांची मुस्कटदाबी करण्याचा प्रकार केला जात आहे. रेस्टॅारंट सात दिवस पूर्णपणे बंद ठेवणे हा निर्णय अन्यायकारक आहे – अनिल कुमार अनीवाल (हॉटेल व्यावसायिक)
प्रशासनाचा आजचा निर्णय म्हणजे एकाला एक न्याय आणि दुसऱ्यांना एक न्याय असाच आहे. मोठमोठ्या कंपन्यांत कामगार लोक एकत्र काम करण्यास परवानगी आहे. मात्र हॉटेलला व्यावसायिकांना नाही, हॉटेल व्यावसायिक पण शासनाचे सर्व कर भरून अर्थव्यवस्थेस हातभार लावण्याचे काम करत असतात. शासनाच्या सोशल डिस्टिंग, मास्क, सॅनिटायझर, थर्मल स्कॅनिंग या सर्व नियमांचे पालन करून आमचे ग्राहक हे येत असतात. तरीही ह़ॉटेलचालकांवरतीच असे निर्बंध लावणे चुकीचे आहे. – रामा शर्मा (हॉटेल व्यावसायिक)
मागील आठ महिन्यांपासून हॉटेल व्यावसाय बंद असताना आता कुठे तरी तो तीस ते चाळीस टक्के व्यवसाय चालू झाला होता. लॉकडाऊन काळातील थकलेले भाडे, वीजबील, कामगारांचे पगार, बँकांचे हप्ते दिल्यानंतर आता कुठे थोड्या फार प्रमाणात व्यवसाय पूर्वपदावर येत असताना प्रशासनाचा हा निर्णय चुकीचा आहे. महागाई शिगेवर पोहोचली असून केवळ पेट्रोल डिझेल नाहीतर खाद्यतेल 180 रूपये ऐवढे महाग झाले आहे. हॉटेल व्यावसाय हा फक्त हॉटेलपुरता मर्यादित नसून त्याला पुरवठा करणारया अनेक लोकांवर उपासमारीची वेळ येते. हा निर्णय पुर्णपणे चुकीचा असून प्रशासनाने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा. – राहूल कुलकर्णी (हॉटेल व्यावसायिक)