Friday, June 21, 2024
Homeताजी बातमीपोटनिवडणुकीसाठी ताकद पणाला; मुख्यमंत्री दोन दिवस पुण्यात तळ ठोकून

पोटनिवडणुकीसाठी ताकद पणाला; मुख्यमंत्री दोन दिवस पुण्यात तळ ठोकून

मुख्यमंत्री शिंदे यांनी कसबा; तसेच चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक गांभीर्याने घेतली आहे. याचे चित्र कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील निकालात उमटणार आहे. या पार्श्वभूमीवर दोन्हीही ठिकाणी विजय मिळवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले दोन दिवस पुण्यात तळ ठोकून आहेत.

शिंदे यांची यंत्रणाही भाजपच्या मदतीला उतरली आहे. या यंत्रणेकडून कसब्यातील महापालिकेच्या चारही प्रभागांमध्ये विविध घटकांशी संपर्क साधण्यात येत आहे. शिंदे सोमवारी दुपारी अचानक पुण्यात डेरेदाखल झाले. त्यांनी ‘आरसीएम’ गुजराथी शाळेत विविध समाज घटकांशी संवाद साधला. या माध्यमातून त्यांनी प्रथमच निवडणुकीत लक्ष घातले. त्या दिवशी कसबा आणि चिंचवड मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी पहाटेपर्यंत संवाद साधला. चिंचवड येथे खासदार श्रीरंग बारणे यांच्या घरी पहाटे चार वाजता कार्यकर्त्यांशी चर्चा केली. निवडणुकीच्या प्रचारात असलेले ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री चंद्रकांत पाटील; तसेच प्रवीण दरेकर यांच्याशी चर्चा करून प्रचाराचा आढावा घेतला.

पहाटेपर्यंत गाठीभेटी सुरूच

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा बुधवारी रात्री बारा वाजता पुण्यात दाखल झाले. त्यांनी पुण्यात आल्यावर थेट सारसबाग येथील पक्षाच्या कार्यालयास भेट दिली. या ठिकाणी पहाटेपर्यंत ते विविध कार्यकर्त्यांना भेटत होते. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील भाजप; तसेच मनसेच्या नेत्यांशीही त्यांनी चर्चा केली. त्यानंतर ते मुक्कामासाठी कोंढवा परिसरातील एका क्लबमध्ये गेले. शिंदे यांनी तेथेही प्रमुख कार्यकर्त्यांशी निवडणुकीबाबत चर्चा केली. या बैठका सकाळी सहापर्यंत सुरू होत्या. त्यानंतर काही तास आराम केल्यानंतर शिंदे यांच्या बैठकांचा सपाटा पुन्हा सुरू झाला. मुख्यमंत्री गुरुवारी सायंकाळी पुन्हा पक्षाच्या कार्यालयात दाखल झाले. त्या ठिकाणी पत्रकार परिषदही घेतली. शिंदे यांच्या गाठीभेटी; तसेच बैठकांचा सपाटा गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होता. त्यानंतर ते शुक्रवारी दुपारी पुन्हा कसब्यात रोड-शोसाठी जाणार आहेत. त्यांच्याच उपस्थितीत कसब्यातील प्रचाराचा समारोप होणार आहे. अशा प्रकारे कसबा; तसेच चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक जिंकण्यासाठी शिंदे यांनी वैयक्तिक पातळीवरही ‘नाकाबंदी’ करण्यास सुरुवात केल्याने त्याचे पडसाद दोन्हीही मतदारसंघात उमटू लागले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments