मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या प्रलंबित मागणीसाठी महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने खासदार श्रीरंग बारणे यांची भेट घेतली. सदर विषयासंदर्भात सखोल चर्चा केली आणि आणि पाठपुरावा म्हणून पुन्हा निवेदन सादर केले. यावेळी शिष्टमंडळातील सदस्य मसाप उपाध्यक्षा डॉ. रजनी शेठ, श्रीकांत जोशी, डी. बी. शिंदे, राधाकृष्ण कुलकर्णी, रवींद्र झेंडे, सुहास घुमरे, श्रीपाद सटवे, विजय शेंडगे आदि उपस्थित होते.
दोन वर्षापूर्वी मसाप पिंपरी चिंचवड शाखेने खासदार बारणे यांना यासंदर्भात निवेदन सादर केले होते. त्यावेळी बारणे यांनी मराठी अस्मितेचा हा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला होता. तदनंतर मसाप पुणे, सातारा शाखा व पिंपरी चिंचवड शाखेचे अनुक्रमे प्रा. मिलिंद जोशी, विनोद कुलकर्णी, राजन लाखे या प्रतिनिधींनी साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे जाऊन तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती आणि या संदर्भात ठाम भूमिका घ्यावी असे निवेदन दिले होते. परंतु आजतागायत आभिजात भाषेचा प्रश्न सुटला नाही.
आज पुन्हा बारणे यांना निवेदन देताना झालेल्या चर्चे दरम्यान अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्यासाठी असलेले सर्व निकष मराठी भाषेने पूर्ण करुनही मराठी भाषेला अभिजात दर्जा पासून वंचित ठेवले ही खेदाची बाब आहे असे लाखे म्हणाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेने गेल्या सहा वर्षापासून या संदर्भात पुणे जिल्ह्यातील मराठी प्राध्यापकांचे चर्चासत्र, परिसंवाद, साहित्यिकांच्या सह्यांची मोहीम, मा. पंतप्रधान यांना पाठविलेल्या पत्रांची मोहीम अशा विविध राबविलेल्या उपाक्रमाकडे लक्ष वेधले असता बारणे म्हणाले, माझे केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्याशी बोलणे झाले असून अभिजात दर्जेबाबतची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्याची घोषणा होणे बाकी आहे. आणि मसापच्या पाठपुराव्यााला नक्की यश मिळणार आहे अशी आशा व्यक्त केली.
विलंब लागत असल्यास लोकसभेत पुन्हा आवाज उठवू अशी ग्वाही ही त्यांनी दिली.


