२९ डिसेंबर
सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून स्टेट बँकेने ग्राहकांना नव्या वर्षांत ‘ओटीपी’ आधारित एटीएम व्यवहार सुविधा देऊ केली आहे. निवडक कालावधी व रकमेसाठी ही सुविधा येत्या १ जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे.
बँकेची ही सुविधा रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेसाठीच असेल; तसेच एटीएममधून एकाच वेळी काढण्यात येणाऱ्या १०,००० रुपयांपेक्षा अधिक रकमेकरिताच ती लागू असेल, असेही स्टेट बँकेने स्पष्ट केले आहे.
स्टेट बँकेच्या ग्राहकाने पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये कार्ड टाकल्यानंतर त्याला ‘ओटीपी’ नोंदविण्यास सांगितले जाईल. ग्राहकाच्या बँक खात्याशी संलग्न मोबाइलवर हा ‘ओटीपी’ आल्यानंतर त्याने तो एटीएमवरील संबंधित रकान्यात नमूद करावयाचा आहे.
या बदलाकरिता बँकेच्या ग्राहक, खातेदारांना स्वतंत्र अशी कोणतीही प्रक्रिया करावी लागणार नाही, असे स्पष्ट करतानाच ‘ओटीपी’बरोबरच ‘पिन’ही अनिवार्य करण्यात आला आहे. तसेच स्टेट बँकेव्यतिरिक्त अन्य बँकेच्या एटीएममध्ये कार्ड वापराकरिता ‘ओटीपी’ची सुविधा कार्यान्वित होणार नाही, असेही नमूद करण्यात आले आहे.