५ जुलै २०२१,
कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील सर्वाधिक वयाचे आरोपी स्टॅन स्वामी (८४) यांचं वांद्रे येथील होली फॅमिली रुग्णालयात निधन झालं आहे. स्वामी यांचं आज दुपारी १.३५ वाजता निधन झालं. मुंबई हायकोर्टातील सुनावणीदरम्यानच होली फॅमिली रुग्णालयातील डॉ. डिसूझा यांनी न्यायमूर्ती संभाजी शिदे व न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठाला याबाबत माहिती दिली.
‘स्टॅन स्वामी यांना शनिवारी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर आम्ही आवश्यक ते सर्व प्रयत्न केले, उपचार केले,’ अशी माहिती डॉ. डिसूझा यांनी मुंबई हायकोर्टाला दिली आहे. त्यानंतर स्वामी यांच्या निधनावर शोक व्यक्त खंडपीठाने म्हटलं की, ‘आम्हाला या बातमीने अत्यंत दु:ख झालं आहे. आम्हाला सांत्वन करण्यासाठी शब्द नाहीत.’
‘नवी मुंबईतील तळोजा रुग्णालयात असताना स्वामी यांना तीनदा रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यांना करोनाची लागणही झाली. त्यामुळे तळोजा तुरुंग प्रशासन, राज्य सरकार आणि एनआयएने त्यांच्या बाबतीत अक्षम्य हलगर्जीपणा केला,’ असा आरोप स्वामी यांचे वकील अॅड. मिहिर देसाई यांनी केला आहे. तसंच मृतदेहाचे पोस्टमॉर्टेम व्हायला हवे, अशी मागणीही देसाई यांनी केली आहे.
दरम्यान, एनआयएतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनीही अतीव दु:ख व्यक्त केलं आणि त्याचवेळी अॅड. देसाई यांनी लावलेले आरोप योग्य नसल्याचं म्हणणं मांडलं आहे. मात्र असे सर्व युक्तिवाद, म्हणणे मांडण्याची आता ही वेळ नाही, असं सांगून खंडपीठाने दोघांनाही थांबवलं.