दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पुन्हा एकदा वानखेडेच्या मैदानात धावांचा डोंगर उभारला. क्विंटन डीकॉकच्या विक्रमनी शतकाच्या जोरावर आफ्रिकेने यावेळी ३८२ धावा उभारल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव गडगडला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाने या सामन्यात दणदणीत विजय मिळवला. या विजयासह गुणतालिकेत मात्र मोठा बदल झाला आहे.
क्विंटन डीकॉकने यावेळी बांगलादेशच्या गोलंदाजीची पिसे काढली. सुरुवातीपासून डीकॉकने धडाकेबाज फटकेबाजी केली आणि बांगलादेशच्या गोलंदाजांचा आपल्यापुढे नतमस्तक होण्यास भाग पाडले. डीकॉकने यावेळी १४० चेंडूंत १५ चौकार आणि सात चौकारांच्या जोरावर १७४ धावांची धमाकेदार खेळी साकारली. डीकॉकने संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि विजयाचा भक्कम पाया रचला. हसन महमुदने डीकॉकला बाद केले आणि बांगलादेशला मोठे यश मिळवून दिले. पण या यशाचा आनंद बांगलादेशच्या संघाला जास्त काळ अनुभवता आला नाही. कारण त्यानंतर हेन्रिच क्लासिनचे वादळ वानखेडेच्या मैदानात घोंघावल्याचे पाहायला मिळाले.
क्लासिनने यावेळी आक्रमक फटकेबाजी करत बांगलादेशचे कंबरडे मोडल्याचे पाहायला मिळाले. कारण क्लासिनने यावेळी फक्त ४९ चेंडूंत २ चौकार आणि आठ षटकारांच्या जोरावर ९० धावांची दमदार खेळी साकारली आणि त्यामुळे बांगलादेशचा संघ बेचिराख झाला. यावेळी क्लासिनला कर्णधार एडन मार्करमची चांगली साथ मिळाली. मार्करमने यावेळी सात चौकारांच्या जोरावर ६० धावा केल्या. अखेरच्या षटकांमध्ये डेव्हिड मिलरने जलदगतीने धावा लुटल्या. मिलरने यावेळी फक्त १५ चेंडूंत एक चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद ४३ धावा केल्या आणि त्यामुळेच दक्षिण आफ्रिकेच्या संघाला ३८२ धावांचा डोंगर उभारता आला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने या विजयासह आपले ८ गुण पूर्ण केले आहेत. गुणतालिकेत दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांचे समान ८ गुण आहेत. पण रन रेट चांगला असल्यामुळे यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने न्यूझीलंडला मागे ढकलत दुसरे स्थान पटकावले आहे. भारतीय संघाला मात्र गुणतालिकेत कोणताच धक्का बसलेला नाही. कारण ते अव्वल स्थानावर विराजमान आहेत.
दक्षिण आफ्रिकेच्या २८३ धावांचा पाठलाग करताना सुरुवातीपासून धक्के बसायला सुरुवात झाली. बांगलादेशची सुरुवात चांगली झाली नाही आणि त्यानंतर एकामागून एक त्यांच्या विकेट्स गेल्या. त्यामुळे त्यांना या सामन्यात विजय मिळवता आला नाही. महमुदुल्लाहने यावेळी अर्धशतकी खेळी साकारली खरी, पण तोपर्यंत हा सामना बांगलादेशच्या हातून निसटला होता.