Tuesday, February 27, 2024
Homeगुन्हेगारीसोमय्या प्रकरण पुणे पोलिसांना भोवणार; केंद्राचे पथक पुण्यात येऊन चौकशी करणार…

सोमय्या प्रकरण पुणे पोलिसांना भोवणार; केंद्राचे पथक पुण्यात येऊन चौकशी करणार…

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गेल्या आठवड्यात पुणे महापालिकेत झालेला हल्ला हा पुणे पोलिसांना भोवणार असल्याची चिन्ह दिसू लागली आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाचे पथक या घटनेच्या चौकशीसाठी पुण्यात दाखल होणार असून त्यांनी दिलेल्या अहवालानंतर कारवाईची पुढील दिशा ठरणार असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. दरम्यान, केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याची गंभीर दखल घेतली असल्याची चर्चा आहे.

सोमय्या हे गेल्या आठवड्यात शनिवारी पुणे महापालिकेत आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आले होते. या प्रसंगी शिवसैनिकांनी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या गोंधळात सोमय्या हे पायऱ्यांवर पडल्याने जखमी झाले होते. सोमय्या यांना यावेळी ढकलण्यात आल्याचा आरोप होत आहे. या घटनेनंतर उपलब्ध झालेल्या फुटेजनुसार सोमय्या यांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न होता, असा आरोप केला आहे. त्यांना मारण्यासाठी तेथे मोठे दगड आणण्यात आले होते, अशीही तक्रार त्यांनी केली आहे. पुणे पोलिसांनी आरोपींवर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते. मात्र, तसे न झाल्याने सोमय्या यांनी थेट केंद्रीय गृहसचिवांची भेट घेत तक्रार केल्याने या घटनेला राजकीय वळण लागल्याचे चित्र दिसू लागले आहे.

सीआयएसएफ आणि सीपीटी

सोमय्या यांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची सुरक्षा पुरविण्यात आलेली आहे. या दलाचे एक पथक सोमय्या यांच्या समवेत सातत्याने असते. क्लोज प्राक्जिमिटी टीमने (सीपीटी) सोमय्यांजवळ आंदोलनकर्त्यांना कसे पोहोचू दिले, याची चौकशी सीआयएसएफच्या पथकाने नुकतीच केली आहे. या पथकातील कर्मचारी, अधिकाऱ्यांचीही खातेअंतर्गत चौकशी सुरू झाली आहे.

पालिकेतही कारवाई?

सोमय्या पुणे महापालिकेत शनिवारी आले होते. यावेळी महापालिकेला सुट्टी होती. असे असतानाही आंदोलनकर्ते महापालिकेत कसे पोहोचले, याची चौकशी महापालिका आयुक्तांनी सुरू केली आहे. सुरक्षा व्यवस्थेत कुचराई करणाऱ्या कर्मचाऱयांवर कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता आहे.

स्थानिक पोलिसांवर कारवाई?

शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पुणे महापालिकेची इमारत येते. महापालिकेतील आंदोलने, व्हीआयपी मुव्हमेंट यांवर शिवाजीनगर तसेच विशेष शाखेच्या पोलिसांचे लक्ष असते. सोमय्या हे शनिवारी महापालिकेत येणार असल्याची पोलिसांना माहिती होती. या पार्श्वभूमीवर एलआयबीच्या कर्मचाऱयांना तेथे होणाऱया आंदोलनाची माहिती मिळाली नव्हता का? मिळाली असेल तर काय उपाययोजना केल्या, याचीही चौकशी करण्यात येत आहे. या चौकशीअंती काही कर्मचारी, अधिकाऱयांवर कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments