सिंधुताईचे अंत्यसंस्कार दफनविधी पद्धतीनं का करण्यात आले याची सध्या चर्चा आहे. याबाबतची माहिती ताईंच्याच संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी दिली. त्यानुसार, सिंधुताई सपकाळ यांनी महानुभाव पंथाची दीक्षा घेतली होती. त्या पंथामध्ये मृत्यूनंतर दफन करण्याची प्रथा आहे. या पंथाच्या रूढीपरंपरेनुसारच आपले अंत्यसंस्कार व्हावेत, अशी सिंधुताईंची इच्छा होती. त्यामुळंच त्यांचे पार्थिव दफन करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुताईंच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सिंधुताईंना अखेरचा निरोप देण्यात आला. अंत्ययात्रेच्या दरम्यान श्री चक्रधर स्वामींच्या नावाचा जप सुरू होता. तसंच, श्रीमद्भगवतगीतेच्या श्लोकांचंही उच्चारण करण्यात आलं. सिंधुताईंना निरोप देताना उपस्थितांना अश्रू अनावर झाले होते.
महानुभाव पंथात ही प्रथा कशी सुरू झाली?
महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी खडकुली इथं वास्तव्यास असताना स्वामींच्या एका भक्ताचं निधन झालं. तेव्हा स्वामींनी त्याचा दफनविधी करण्यास सांगितलं. तेव्हापासून महानुभाव पंथात याच पद्धतीनं अंत्यविधी होत असतो. महानुभाव पंथात या विधीला ‘भूमीडाग’ म्हटले जाते. विशेष म्हणजे महानुभाव पंथात दफन केलेल्या व्यक्तीची समाधी उभारली जात नाही. जाधववाडी इथं असलेल्या महानुभाव पंथाच्या मठातील सदस्यांनी ही माहिती दिली.