Wednesday, July 15, 2026
Homeअर्थविश्वमुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळला; अतिवृष्टीमुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत, मुंबई- पुणे...

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळला; अतिवृष्टीमुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत, मुंबई- पुणे प्रवास करणे टाळावे प्रशासनाचे आवाहन

लोणावळा | प्रतिनिधी- लोणावळा घाट परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील नव्याने उभारण्यात आलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराजवळ स्लॅब कोसळल्याची गंभीर घटना सोमवारी घडली. या घटनेनंतर डोंगरावरील माती, दगड आणि राडारोडा मार्गावर पडू लागल्याने महामार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने या मार्गावरील वाहतूक नियंत्रणात ठेवत नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या तीन दिवसांपासून लोणावळा, तळेगाव आणि घाट परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे डोंगर उतारावरील माती सैल झाली असून अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर मिसिंग लिंक प्रकल्पाच्या एंट्री पॉइंटजवळील स्लॅब अचानक कोसळला. या घटनेनंतर छताच्या भागातून डोंगरावरील माती आणि दगड खाली पडत असल्याने संबंधित परिसर धोकादायक बनला आहे.

घटनेनंतर मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने उर्से टोलनाक्यावर रोखण्यात आली असून महामार्गावरील वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू आहे. महामार्ग पोलिसांनी वाहनचालकांना या मार्गावर न येण्याचे आवाहन केले असून, प्रवास करणे अत्यावश्यक असल्यासच घराबाहेर पडावे, असा सल्ला दिला आहे. लोणावळ्यापासून सुमारे ३५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने हजारो प्रवासी अडकून पडले आहेत.

दरम्यान, खोपोलीजवळील पाताळगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या परिसरात पुराचे पाणी शिरले आहे. काही ठिकाणी नागरिकांच्या घरांमध्ये आणि परिसरात पाणी शिरल्याने नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील काही फूड मॉल परिसरातही पावसाचे पाणी साचल्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

रस्ते वाहतुकीबरोबरच रेल्वे वाहतुकीलाही मोठा फटका बसला आहे. पुणे-मुंबई लोहमार्गावरील ठाकूरवाडी परिसरात दरड कोसळल्याने रेल्वे वाहतुकीत अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून पुण्याकडे जाणाऱ्या काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

महामार्ग आणि रेल्वे या दोन्ही प्रमुख मार्गांवर अतिवृष्टीचा परिणाम झाल्याने पुणे आणि मुंबईदरम्यानची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. परिस्थितीवर महामार्ग पोलीस, रेल्वे प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन सतत लक्ष ठेवून असून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

प्रशासनाने नागरिकांना प्रवासाचे नियोजन पुढे ढकलण्याचे आवाहन केले असून शासन, महामार्ग पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या वाहतूक सूचना आणि अद्ययावत माहितीकडे लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. सार्वजनिक सुरक्षेला प्राधान्य देत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments