राज्यभरात शेतकऱ्याची विदारक परिस्थिती आपण अनेकदा पाहतो. दसरा सण असल्याने झेंडूच्या फुलांना खूप महत्त्व आहे. आपल्या फुलांना चांगला भाव मिळावा यासाठी शेतकरी अनेक मोठ्या मार्केटला फुले विक्री करण्यासाठी स्वतःचे पैसे खर्च करून, व्याजाने पैसे घेऊन, भाड्याने गाडी करून जातो. मात्र, जेव्हा त्याच्या फुलांना एकही रुपया मिळत नाही, तेव्हा त्या शेतकऱ्यांची अवस्था काय होत असेल याचा विचार ना केलेला बरा. असेच एक भयानक वास्तव दसरा सणाच्या निमित्ताने समोर आले आहे.
जालना येथील विकास राजू वाघ हा युवक शेतकरी आपल्या घरच्यांसोबत झेंडू ची फुले विकण्यासाठी तीन दिवसांपूर्वी जालना येथून आला होता. सुरुवातीला तो पुण्यातील मार्केट मार्ड येथे फुले विक्रीसाठी आला होता. मात्र, येथे त्या फुलांची विक्री झाली नाही. त्यानंतर तो वाशी मार्केट ला घेऊन गेला, तिथे देखील सेम परिस्थिती पाहायला मिळाली. शेवटी त्या शेतकऱ्यांनी फुलासह जालन्याला जाण्यासाठी प्रवास सुरू केला. पुणे जिल्ह्यातील शिरूर जवळ आल्यानंतर त्याने गाडीतील जवळपास वीस पेक्षा जास्त फुलांचे क्रेट रस्त्त्यावर फेकून दिले.
तीन दिवसापासून आम्ही आमचं घर सोडून फुले विक्री करण्यासाठी आलो होतो. पुण्यातील आणि मुंबईतील मार्केट फिरलो पण आमच्या फुलला एकही रुपया मिळाला नाही. आम्ही दोन दिवसांपासून काही खाल्लेले देखील नाही. तीन दिवसांपासून झोपलो नाही, पोटाला खाल्लं देखील नाही. बाहेरून आयात करणार आणि आमच्या शेतकऱ्यांची त्यांनी माती करून टाकली, अशा संतप्त भावना या युवा शेतकरयांने व्यक्त केली आहे.
मात्र, दसरा सणाच्या मुहूर्तावर आपल्या कुटुंबासोबत दसरा सण साजरा करावा, अशी अपेक्षा मनात असताना देखील पन्नास क्रेट पैकी एकही फुल विकले गेले नाही. आता कुटुंबाला काय उत्तर द्यायचे अशा भावना जड अंतःकरणाने शेतकऱ्याने व्यक्त केल्या आहेत.