माजी खासदार अमर साबळे यांच्या हस्ते पथसंचलनाचा प्रारंभ; सोनं लुटण्याच्या पारंपरिक सोहळ्यात शेकडो नागरिकांचा सहभाग
पिंपरी-चिंचवड : दसरा आणि विजयादशमीनिमित्त संत तुकाराम नगर व वल्लभनगर परिसरात सीमोल्लंघन, पथसंचलन आणि सोनं लुटण्याचा पारंपरिक सांस्कृतिक सोहळा उत्साहात पार पडला. राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या पुढाकारातून परिसरात प्रथमच या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. माजी खासदार अमर साबळे यांच्या हस्ते (दि. २०) पथसंचलनाचा प्रारंभ करण्यात आला. या सोहळ्यात शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
राष्ट्रीय श्रमिक आघाडी आणि संत तुकाराम नगर सहकारी गृह रचना संस्था मर्यादित यांच्या वतीने विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर दुपारी तीन वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची संकल्पना व नियोजन यशवंतभाऊ भोसले यांनी केले होते. सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि पारंपरिक सांस्कृतिक वारशाचे जतन हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
दसऱ्यानिमित्त संत तुकाराम नगर येथील राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या कार्यालयापासून पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य रॅलीला सुरुवात झाली. रॅलीदरम्यान जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला. स्वामी मंदिरात स्वामींना पुष्पहार अर्पण करण्यात आला, तर बुद्धविहारात भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
गंगानगर ते अक्षय सोसायटी–वायसीएमएच या मार्गावरील सीमोल्लंघन सोहळ्यापूर्वी माजी खासदार अमर साबळे आणि यशवंतभाऊ भोसले यांचे श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक बबनराव गाढवे, भाजप नेते किरण सुवर्णा, भाजप मंडलाध्यक्ष मंगेश धाडगे, भाजप नेते नंदू आप्पा कदम, महेंद्र बाविस्कर, दिनेश पाटील, शेखर पाटील आणि संदीप नाईक यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
त्यानंतर वल्लभनगर आणि संत तुकाराम नगर यांच्या सीमारेषेवरील गणेश मंदिरात पारंपरिक सीमोल्लंघनाचा कार्यक्रम पार पडला. दोन्ही परिसरांतील नागरिकांनी एकत्र येत गणेश मंदिरात भक्तिभावाने सोनं लुटण्याच्या परंपरेत सहभाग घेतला. एकमेकांना आपट्याची पाने देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. या परंपरेतून परस्परांतील स्नेह, प्रेम आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यात आला. विशेष म्हणजे, यशवंतभाऊ भोसले यांची सहा वर्षांची नात लिनेशा हिनेही प्रथमच सोनं लुटण्याच्या आणि पथसंचलनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला.
सीमोल्लंघनातून सामाजिक एकात्मतेचा संदेश : अमर साबळे
यावेळी बोलताना माजी खासदार अमर साबळे म्हणाले की, विजयादशमीच्या सीमोल्लंघन परंपरेतून दुःखातून सुखाकडे आणि पराभवातून यशाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा मिळते. यशवंतभाऊ भोसले यांनी वल्लभनगर आणि संत तुकाराम नगर परिसरात ही परंपरा सुरू करून सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक ऐक्य यांना जोडण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यात या परिसराचा सामाजिक-सांस्कृतिक इतिहास लिहिला जाईल, तेव्हा या उपक्रमाची निश्चितच आठवण राहील, असे त्यांनी नमूद केले.
यशवंतभाऊ भोसले यांनी यापूर्वी परिसरात आषाढी एकादशीनिमित्त दिंडीची परंपराही सुरू केली आहे. या दिंडीत परिसरातील नागरिक, वारकरी आणि भाविक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. सीमोल्लंघन आणि आषाढी दिंडी या दोन्ही उपक्रमांमधून स्थानिक संस्कृतीचे जतन करण्याबरोबरच नागरिकांमधील एकोपा वाढविण्याचा प्रयत्न होत असल्याचे साबळे यांनी सांगितले.
ऐतिहासिक परंपरेचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न
कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी आपल्या मनोगतात सीमोल्लंघनाच्या परंपरेमागील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संदर्भ स्पष्ट केले. पूर्वी ग्रामीण भागात दोन गावांतील नागरिक सीमारेषेवर एकत्र येऊन गळाभेट घेत, एकमेकांना शुभेच्छा देत आणि मंदिरात जाऊन सोनं लुटण्याची परंपरा पाळत असत. याच परंपरेचे संत तुकाराम नगरमध्ये पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या नियोजनात चाकण एमआयडीसी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे, अनिकेत भोसले, दीपक शेठ पाटील, दत्ताजी गायकवाड, आदित्य देशपांडे, राहुल शितोळे, अंकुश वाघमारे, अप्पू नायर, ओमकार जोकारे, मानसी देशपांडे, लता पाटील, चंद्रकांत भालेराव, शालन महापुरे, योगेंद्र आरवडे, कैलास गव्हाणे, शिरीष सासवडे, सतीश सासवडे, श्रेयस करे, विनायक निकम, जेवियर अँथोनी, किसन भाग्यवंत, मल्लेष कोरवी, इस्मत सय्यद, दगडू लेंडे, रावसाहेब पाबळे, सुदाम गायकवाड, आप्पासाहेब माने, नंदकिशोर जोशी, महेश भुते, आरती पराळे, उषा टाकळकर, सुधाकर शिंदे, अंकुश गायकवाड, फौजदार गायकवाड, भाऊसाहेब गायकवाड, राजाराम भोंडवे, संतोषी चौधरी, सना शेख, दत्तात्रय झरकर, अमोल घोरपडे, प्रिया घोरपडे आणि रजनी मगर यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला.


