Friday, September 29, 2023
Homeताजी बातमीपुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा अंतिम निकाल सायंकाळपर्यंत लांबण्याची चिन्हे

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा अंतिम निकाल सायंकाळपर्यंत लांबण्याची चिन्हे

३ डिसेंबर २०२०
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार मतदार संघांच्या निवडणुकीच्या मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. उमेदवारांची संख्या जास्त असल्याने जम्बो मतपत्रिका झाल्या आहेत. त्यामुळे मतपत्रिका एकत्र करणे, वैध आणि अवैध मतपत्रिका वेगवेगळ्या करणे, कोटा निश्चित करणे या प्रक्रिया पूर्ण होण्यास विलंब लागणार असून, प्रत्यक्ष मतमोजणी होण्यास सायंकाळ होणार असल्याचा अंदाज आहे.

बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे मतमोजणीच्या प्रक्रियेला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. पदवीधर मतदार संघात ६२ उमेदवार असल्याने मतपत्रिका ही जम्बो आकाराची आहे. शिक्षक मतदार संघामध्ये ३५ उमेदवार आहेत. मतपत्रिका एकत्र करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यानंतर वैध आणि अवैध मतपत्रिका वेगवेगळ्या केल्या जाणार आहेत. त्यानंतर उमेदवारांना निवडून येण्यासाठी पाहिल्या पसंतीसाठी मतांचा कोटा निश्चित केला जाणार आहे.

पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड, भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रुपाली पाटील-ठोंबरे आणि जनता दल सेक्युलरचे माजी आमदार शरद पाटील यांच्यात चौरंगी लढत आहे.शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे जयंत आसगावकर, भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार, विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत, मनसेचे विद्यानंद मानकर, लोकभारती पक्षाचे गोरखनाथ थोरात, अपक्ष उमेदवार संतोष फासगे यांच्यात चुरस आहे.

पदवीधर मतदार संघासाठी चार लाख २६ हजार २५७ मतदार होते. त्यापैकी दोन लाख ४७ हजार ५० मतदारांनी मतदान केले. हे प्रमाण सरासरी ५७.९६ टक्के आहे. शिक्षक मतदार संघासाठी ७२ हजार ५४५ मतदारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५२ हजार ९८७ मतदारांनी मतदानाचा हक्का बजाविला. हे प्रमाण सुमारे ७३.०४ टक्के आहे. दोन्ही मतदार संघामध्ये पुणे जिल्ह्यातील मतदार हे सर्वाधिक आहेत. पदवीधरसाठी ६१ हजार ४०४ आणि शिक्षक मतदार संघासाठी १८ हजार ८४९ पुणेकर मतदारांनी मतदान केले असून, ही मते निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments