१० जुलै २०२१,
केरळमध्ये शुक्रवारी झिका विषाणू रुग्णांची संख्या १४ वर पोहोचली आहे. १४ पैकी १३ जण आरोग्य कर्मचारी आहेत. राष्ट्रीय विषाणू संस्थेकडून १३ जणांना झिका विषाणूचा संसर्ग झाल्याचं समोर आल्यानंतर केरळमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. झिकाचे सर्व रुग्ण तिरुअनंतपुरम येथील आहेत. राज्यात गुरुवारी एका २४ वर्षीय गरोदर महिलेला संसर्ग झाल्याच समोर आलं होतं. संबंधित महिलेची ७ जुलैला प्रसुती झाली होती. महिलेसर तिच्या बाळाची प्रकृती स्थिर असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे.
राज्य सरकारच्या माहितीनुसार राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे १९ नमुने पाठवण्यात आले होते. त्यापैकी १३ रुग्णांना झिकाचा संसर्ग झाल्याची माहिती आहे. डेंग्यूची लक्षणं साधारणपणे डेंग्यू सारखी असतात. झिकाचे पहिले लक्षण म्हणजे ताप येणे, अंगदुखणे, अंगावर लाल रंगाचे चट्टे येणे तसेच या व्हायरल दरम्यान प्रचंड डोकेदुखी होते, डोळे लाल होणे, अशक्तपणा आणि थकवा हे देखील या व्हायरलचे प्रमुख लक्षण आहे. मात्र, सुरूवातीला आलेल्या तापावरून झिका व्हायरल कळणे थोडे कठीण आहे.
केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी राज्य सरकारनं झिका संक्रमण रोखण्यासाठी योजना तयार केली असल्याची माहिती दिली आहे. राज्यातील सरकारी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयांमध्ये चाचणी करण्याची सुविधा करण्यात येत असल्याची माहिती दिली.केरळमध्ये झिकाचे १४ रुग्ण समोर आल्यानंतर तामिळनाडू सरकार अलर्ट झालं आहे. तामिळनाडूच्या आरोग्य विभागानंल जिल्हा आणि विशेषता केरळच्या सीमेवरील जिल्ह्यांवर चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत.
सध्या झिका व्हायरसला कोणतीही लस किंवा उपचार नाही. झिका व्हायरसमध्ये आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर गंभीर परिणाम होतो. गर्भवती महिलांमध्ये हा संसर्ग विकसनशील गर्भास गंभीरपणे हानी पोहोचवू शकतो आणि जन्मजात विसंगती होऊ शकतात. हा झिका व्हायरस डासांमुळे होतो.