Sunday, June 16, 2024
Homeगुन्हेगारीधक्कादायक.. ! अंगावर पेट्रोल ओतून महिलेची आत्महत्येची धमकी

धक्कादायक.. ! अंगावर पेट्रोल ओतून महिलेची आत्महत्येची धमकी

दारु पिऊन घरी आल्यानंतर मारहाण करणाऱ्या पतीला भीती दाखविण्यासाठी अंगावर थोडेसे पेट्रोल ओतून घेत ‘मी मरते आता’, अशी धमकी पत्नीने दिली. त्यानंतर आगपेटीची काडी ओढून पतीनेच तिला पेटवून दिल्याचा प्रकार समोर वळती या गावामध्ये घडला आहे.

याबाबत अमृता अक्षय कुंजीर (वय २३, रा. वळती, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी पती अक्षय मारुती कुंजीर आणि सासू आशा मारुती कुंजीर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार वळती गावातील फिर्यादीच्या घरी १२ सप्टेबर रोजी दुपारी दोन वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमृता यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. अमृता आणि अक्षय कुंजीर यांचा २०२० मध्ये प्रेमविवाह झाला असून त्यांना एक मुलगा आहे. अक्षय हा वारंवार दारु पिऊन येऊन मारहाण करतो. १२ सप्टेबर रोजी तो दारु पिऊन आला आणि घरातील सामानाची तोडफोड करीत होता. अमृताची सासू आणि सासरे शेतामध्ये गेले होते. त्यावेळी ‘तू घरातून निघून जा’, असे अक्षयने अमृताला सांगितले. पतीला भीती दाखविण्यासाठी ‘मी मरुन जाते’, असे म्हणत अमृताने शेतीपंपासाठी आणलेल्या पेट्रोलमधील थोडे पेट्रोल अंगावर ओतून घेतले. अक्षयने आगपेटीतून काडी पेटवून तिच्या अंगावर टाकली. त्यानंतर त्यानेच अमृताच्या अंगावर पाणी ओतून विझविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत भाजल्याने अमृताची छाती, गळा आणि तोंडास गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले.

‘तू जर तुला पतीने पेटविले, असे सांगितले तर दवाखान्यात उपचार करणार नाहीत’, अशी भीती सासूने घातली. त्यामुळे ‘चुलीवर स्वयंपाक करताना अचानक पेट्रोल ओतले गेल्याने भडका होऊन भाजले’, असे अमृता हिने सुरुवातीला लोणी काळभोर पोलिसांना भितीपोटी सांगितले होते. पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक खोसे तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments