दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीपात्रात सहा दिवसांमध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ माजली होती. सुरुवातीला ही सामूहिक आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र, आता या प्रकरणात धक्कदायक ट्विस्ट आला आहे. कुटुंबातील नातेवाईंकानीच संपूर्ण कुटुंबाची हत्या केल्याचं समोर आलं आहे.
भीमा नदी पात्रात आढळलेल्या सात जणांची आत्महत्या नसून हत्या असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात चार जणांना संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मोहन पवार (वय ४५), त्यांच्या पत्नी संगीता (४०, दोघे रा. खामगाव, ता. गेवराई), जावई श्याम फलवरे (२८), मुलगी राणी (२४), नातवंडे रितेश (७), छोटू(५) आणि कृष्णा (३, सर्व रा. हातोला, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) यांचे मृतदेह भीमा नदीत आढळले होते. १७ तारखेला हे कुटुंब नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज मधून दौंड तालुक्यातील पारगाव येथील नदीत त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते. मात्र, शवविच्छेदन अहवालात त्यांचा मृत्यू हा बुडून झाला असल्याचे समोर आले होते.
शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अधिक खोलात जाऊन चौकशी केली. तरीही नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं म्हटलं होतं. त्यावर पोलिसांनी तपास केला असता. मोहन पवार यांच्या चुलत भावांनी पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना नदीत फेकून दिलाचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यावरून पोलिसांनी चार जणांवर गुन्हा नोंद करून अटक केली आहे