पुण्यात मध्यरात्री घडलेल्या दुहेरी हत्येच्या थराराने शहरात खळबळ उडाली आहे. सहाय्यक आयुक्ताने हे कृत्य का केलं, याबाबत तर्क-वितर्क लावले जात असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
अमरावती पोलीस दलात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या भरत गायकवाड यांनी पत्नीसह पुतण्याची गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघांना गोळ्या घालून संपवल्यानंतर भरत गायकवाड यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत आपले जीवन संपवले. पुणे शहरात पहाटे सव्वातीन वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला असून या धक्कादायक घटनेमागील कारण अद्याप समोर आलेले नाही. मोनी गायकवाड (वय ४४) आणि पुतण्या दीपक गायकवाड (वय ३५) अशी गोळी झाडून खून केलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील बाणेर, बालेवाडी भागात गायकवाड कुटुंब वास्तव्यास होते. पोलीस दलात वरिष्ठ पदावर काम करत असलेले आणि सध्या सुट्टीवर असलेले भरत गायकवाड हे शनिवारीच पुण्यातील घरी आले होते. मात्र आज पहाटे त्यांनी आधी पत्नी मोनी गायकवाड आणि नंतर पुतण्या दीपक गायकवाड यांची गोळी झाडून हत्या केली. ही घटना घडली तेव्हा एसीपी भरत गायकवाड यांची आई आणि दोन मुलेही घरात होती. पहाटे गोळी झाडण्याचा आवाज ऐकताच त्यांनी खोलीकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत सगळं संपलं होतं.
हत्याकांडानंतर गायकवाड यांच्या घाबरलेल्या मुलांनी या घटनेबाबतची माहिती फोनद्वारे पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता घरात सुसाईड नोट आढळून आलेली नाही. त्यामुळे या घटनेमागील कारणांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास करण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्याकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, पोलीस दलात सहाय्यक आयुक्तपदासारख्या वरिष्ठ पातळीवर काम करत असलेल्या अधिकाऱ्याने दुहेरी हत्येनंतर स्वत:ही आत्महत्या केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. भरत गायकवाड यांनी पत्नी आणि पुतण्याची हत्या करून आत्महत्या का केली, याबाबत पोलीस तपासात नेमकी काय माहिती समोर येते, हे पाहावं लागेल.