निगडी प्राधिकरण येथील मूकबधिर शाळेजवळ चिखलाच्या दलदलीत अडकलेल्या वृद्ध व्यक्तीची प्राधिकरण अग्निशमन उप केंद्राच्या जवानांनी सुखरूप सुटका केली.निळकंठ पाटील (वय 65) असे सुटका केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
शुक्रवारी (दि. 21) सकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास विशाल साळवे यांनी अग्निशमन विभागाला वर्दी दिली की, मूकबधिर शाळा प्राधिकरण निगडी येथे एक व्यक्ती चिखलात अडकली आहे अशी माहिती मिळाल्यानंतर प्राधिकरण उप अग्निशमन केंद्रातील सब ऑफिसर गौतम इंगवले, लीडिंग फायरमन संपत गौंड, वाहन चालक प्रदीप हिले, फायरमन काशिनाथ ठाकरे, ट्रेनी फायरमन अजय साळुंखे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
मूकबधिर शाळा प्राधिकरण निगडी येथे मोकळ्या मैदानात असलेल्या चिखलाच्या दलदलीत एक व्यक्ती कमरेच्यावर पर्यंत अडकली होती.दलदलीतून बाहेर निघण्याचा कोणताही मार्ग नसल्याने तसेच हालचाल करता येत नसल्याने नीलकंठ पाटील हे आहे त्या स्थितीत थांबले होते. जवानांनी शिडी, दोर, सीलिंग हुकाच्या सहाय्याने दलदलीत जाऊन नीळकंठ यांना बाहेर काढले आणि त्यांच्या घरच्यांच्या स्वाधीन केले.
नातवांना शाळेत सोडविण्यासाठी सकाळी निळकंठ हे आले होते. नातवांना शाळेत सोडल्यानंतर मोकळ्या मैदानात लघुशंकेसाठी थांबले.तिथून ते मोकळ्या मैदानातून जात होते. त्याच ठिकाणी गणेश तलावातील गाळ काढून टाकला आहे.त्याची दलदल झाली असेल, याचा अंदाज निळकंठ यांना आला नाही. त्यामुळे ते फसले गेले.
हि चिखलाची दलदल गणेश तलावातील काढलेल्या गाळातील असून आता पावसामुळे तो गाळ पातळ झाला आहे. पालिकेने तिथे कुंपण करावे किंवा येथे धोकादायक असे सूचनाफलक लावावे म्हणजे अश्या घटना परत घडणार नाहीत.