13 वर्षीय मुलीवर अत्याचार करुन नंतर तिला पुण्याला पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे सर्व आरोपी अल्पवयीन आहेत.
बीडमध्ये गेवराई तालुक्यातील एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आलीय. धक्कादायक म्हणजे गावातीलचं एकाने अगोदर अत्याचार केला आणि त्यानंतर 2 मित्रांच्या मदतीने तिला पुण्याला पळवून नेले. यातील अत्याचार करणारा आणि त्याला मदत करणारे दोघेही गावातील असून ते देखील अल्पवयीन असल्याने खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना बीडच्या चकलंबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी चकलंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
काय आहे प्रकरण?
बीडच्या गेवराई तालुक्यात असणाऱ्या एका गावातील अल्पवयीन मुला आणि मुलीची मैत्री झाली. मुलीचे वय अवघे 13 असून मुलांचे त्यापेक्षा दोन वर्ष जास्त आहे. 26 जून रोजी गावातीलच एकाने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर इतर दोन मित्रांच्या मदतीने ते अहमदनगरपर्यंत गेले. तेथून दोन मित्र परत आले तर पीडिता व मुलगा हे पुण्याला गेले. पुण्यातील एका नातेवाइकांकडे त्यांनी आश्रय घेण्याचा प्रयत्न केला. काही तास राहिल्यानंतर नातेवाइकांना यांच्याबद्दल संशय आला. त्यांनी गावाकडे विचारणा केल्यावर हे पळून आल्याचे समजले.
तेथील नातेवाइकांनीही सजगता दाखवत त्यांना भोसरी पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पोलिसांनी नातेवाइकांना पुण्याला बोलावून घेत दोन्ही अल्पवयीन मुलांना त्यांच्या स्वाधीन केले; परंतु परत आल्यावर पीडितेने सर्व प्रकार आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर चकलांबा पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून अत्याचार करणाऱ्यासह पळवून जाण्यास मदत करणाऱ्या दोन मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीडमध्ये बालविवाह थांबेना
बालविवाहाचा अतिशय धक्कादायक प्रकार बीडमध्ये पुन्हा एकदा समोर आला आहे. एकाच मुलीचा तीन वेळा बालविवाह लावल्याची धक्कादायक माहिती चाईल्ड लाईनने समोर आणली आहे. 14 व्या वर्षी पहिला आणि 17 व्या वर्षी तिसऱ्यांदा या मुलीचा बालविवाह लावण्यात आला असून ही धक्कादायक घटना बीडच्या शिरूर तालुक्यामध्ये समोर आली. या घटनेने खळबळ उडाली असून या प्रकरणात कठोर कारवाई करावी अशी मागणी चाईल्ड लाईनचे सदस्य तत्वशील कांबळे यांनी केली.