Saturday, March 22, 2025
Homeगुन्हेगारीपुण्यातील प्रसिद्ध हॉटेलात धक्कादायक घटना; वेटरने फेसबुक लाइव्ह करत केली आत्महत्या …

पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलात धक्कादायक घटना; वेटरने फेसबुक लाइव्ह करत केली आत्महत्या …

पुण्यातील मुंढवा परिसरातील एका प्रसिद्ध हॉटेलच्या तेराव्या मजल्यावरून कामगाराने (वेटर) उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी संबंधित कामगाराने फेसबुक लाइव्ह करत हॉटेलमधील काही लोकांनी त्याला फसवल्याचा आरोप केला व त्यामुळेच आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्याने नमूद केले.

अरविंद सिंह राठौर (वय २६, रा. सनेती, उत्तराखंड) असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी, मुंढवा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद हा मूळचा उत्तराखंडचा रहिवासी आहे. मुंढवा परिसरातील हॉटेल पेंट हाऊस मध्ये तो एक महिन्यापूर्वीच कामाला आला होता. या ठिकाणी वेटरचे काम तो करत होता. बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास तो हॉटेलच्या टेरेसवर (तेराव्या मजल्यावर) गेला. त्या ठिकाणी जाऊन त्याने फेसबुक लाइव्ह करत तो आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. यावेळी त्याने हॉटेलमधील काही लोकांवर आरोप करत त्यांनी आपले वाईट केले असून, फसवून काही कामे करून घेतल्याचे म्हटले आहे. त्यानंतर तो इमारतीच्या भिंतीवर उभा राहिला. हा प्रकार पाहिल्यानंतर तेथील नागरिकांनी त्याला समजावून थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने काही क्षणातच खाली उडी घेतली.

घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी अरविंद रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला होता. उपचारासाठी त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी त्याने आत्महत्या करण्यामागे नेमके काय कारण आहे याचा शोध सुरू असल्याचे मुंढवा पोलिसांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments