गरीब कुटुंबातील मुलांना सर्वसामान्यांप्रमाणे शिक्षण मिळावे या शिक्षण हक्क कायद्याच्या (‘आरटीई’) मूळ उद्देशाला धाब्यावर बसवण्याचा प्रकार चिंचवड येथील शाळेत घडला आहे. चिंचवड येथील नामांकित अशी पोदार इंटरनॅशनल स्कूल या शाळेत ‘आरटीई’ मधून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा वेगळा वर्ग करून त्यांना शाळेच्या मुख्य इमारातीपासून दूर वेगळ्या ठिकाणी त्यांना शिकवले जात असल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चिमुकल्या विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करणाऱ्या या शाळेवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली असून शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी संजय नायकवडी यांच्याकडे ही तक्रार केली आहे
पिंपरी चिंचवड परिसरातील या शाळेत उच्चभ्रू वर्गातील मुले शिकतात ‘आरटीई’ च्या नियमानुसार शाळेला 25% प्रवेश गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना देणे बंधनकारक आहे. शाळेने ही प्रक्रिया पूर्ण केली. पण शाळा सुरू झाल्यानंतर आरटीई द्वारे प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचा वेगळा वर्ग शाळेपासून काही अंतरावर असलेल्या जम्बो किड्स या ठिकाणी सुरू करण्यात आला. ‘आरटीई’ द्वारे प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना अशी कोणतीही वेगळी वागणूक देऊ नये अशी कायद्यात स्पष्ट तरतूद असतानाही पोदार इंटरनॅशनल स्कूल या शाळेने आरटीईच्या नियमांचे उल्लंघन करून विद्यार्थ्यांमध्ये तेढ व भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
दरम्यान एन.एस.यु.आय चे प्रदेश उपाध्यक्ष अँड. उमेश खंदारे यांनी पोद्दार शाळेत ‘आरटीई’ द्वारे प्रवेश मिळालेल्या मुलांना वेगळ्या वर्गात शाळेपासून दूर वेगळ्या इमारतीमध्ये बसवले जाते. इतर खुले प्रवेश घेतलेल्या मुलांचे वेगळे वर्ग वेगळ्या वेळेस घेतले जातात. त्यांना शिकवणारे शिक्षकही वेगळे असतात. त्यांना कुठल्याच सामूहिक कार्यक्रमात सहभागी करून घेतले जात नाही. मैदानावर नेले जात नाही हा सरळ सरळ शिक्षण हक्क कायद्याचा भंग आहे.
पालकांच्या या तक्रारीचे तातडीने दखल घेऊन निराकरण न केल्यास शाळेविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याबरोबरच बालहक्क आयोगाकडेही तक्रार करण्यात येणार आहे. आणि आवश्यकता वाटल्यास या सर्व गोष्टींच्या विरोधात उच्च न्यायालयातही दाद मागण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.
तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी संजय नाईकवडे यांनी दिले आहेत. तसेच चौकशी अंती शाळा याच्यामध्ये दोषी आढळल्यास शाळेवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी पिंपरी चिंचवड महिला काँग्रेस च्या शहराध्यक्षा सौ. सायली ताई नढे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष कौस्तुभ नवले, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव स्वाती ताई शिंदे, निर्मला खैरे, रोहित शेळके, जय ठोमरे, किरण नढे, आशुतोष खैरे, तन्मेश इंगावले आदी उपस्थित होते.