Monday, April 22, 2024
Homeआरोग्यविषयककोव्हिड केअर सेंटरमध्ये एकही रुग्ण दाखल नसताना महापालिकेला ५ कोटी रुपयांची बिले...

कोव्हिड केअर सेंटरमध्ये एकही रुग्ण दाखल नसताना महापालिकेला ५ कोटी रुपयांची बिले सादर केल्याचा धक्कादायक प्रकार

६ फेब्रुवारी २०२१,
पिंपरी चिंचवड मधील भोसरीतील रामस्मृती मंगल कार्यालय आणि हिरा लॉन्स या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये (सीसीसी) अद्याप एकही रुग्ण दाखल झालेला नसताना डॉ. अमोल हळकुंदे यांच्यामार्फत ५ कोटी २६ लाख ६० हजार ८०० रुपयांची बिले महापालिकेला सादर केल्याचा धक्कादायक प्रकार प्रशासकीय टिपणीतून उघडकीस आला आहे.

विषेश म्हणजे या ठिकाणी केवळ खाटा उपलब्ध केल्या होत्या. रुग्णसंख्या घटल्याने एकही रुग्ण ठेवण्यात आला नव्हता. भोसरी येथील रामस्मृती मंगल कार्यालय आणि हिरा लॉन्स या दोन ठिकाणी ‘अ’ श्रेणीतील कोव्हिड केअर सेंटर कार्यान्वित करण्यासाठी स्पर्श रुग्णालयाला ७ ऑगस्ट २०२० रोजी अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी कार्यारंभ आदेश दिला होता. त्याकरिता दररोज १२३९ रुपये प्रतिबेड इतका दर निश्चित करण्यात आला होता. मात्र, संस्थेच्या कार्यारंभ आदेशातील अटीनुसार त्यांच्यामार्फत ‘ईएमडी’ भरण्यात न आल्याने, मनुष्यबळाची माहिती मुदतीत सादर केली नसल्याने करारनामा करण्यात आला नाही. त्यानंतर २१ सप्टेंबर २०२० रोजी म्हणजेच जवळपास ४५ दिवसांनी मनुष्यबळाची यादी सादर करण्यात आली. यादीमध्ये नमूद कर्मचाऱ्यांपैकी स्टाफ नर्स कर्मचाऱ्यांचे नोंदणी प्रमाणपत्र सादर करण्यात आले नव्हते. अनामत रक्कम अद्यापही भरलेली नाही. दोन्हीही सेंटरमध्ये रुग्णांसाठी आवश्यक सर्व सुविधांची तयारी पूर्ण झाल्याचेही नमूद केले होते. त्यानुसार दोन्ही सेंटरची तपासणी करून अहवाल सादर करण्यासाठी ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी यांना कळविण्यात आले होते. त्यांनी २५ सप्टेंबर २०२० रोजी अहवाल सादर केला.

दरम्यान, संस्थेमार्फत वरील बाबींची पूर्तता झालेली नसल्यामुळे त्यांच्यासमवेत करारनामा करण्यात आलेला नाही. असे असतानादेखील संस्थेमार्फत सीईओ डॉ. अमोल हळकुंदे यांनी एक नोव्हेंबर २०२० रोजी रामस्मृती मंगल कार्यालयाच्या कामकाजापोटी १ ऑगस्ट ते २० ऑक्टोबर या कालावधीकरिता दोन कोटी ६३ लाख ३० हजार ४०० रुपये आणि हिरा लॉन्स येथील कामकाजापोटी दोन कोटी ६३ लाख ३० हजार ४०० रुपये अशी ५ कोटी २६ लाख ६० हजार ८०० रुपयांची बिले सादर केली आहेत.

अहवालातून धक्कादायक बाबी समोर

ज्येष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार, दोन्ही कोव्हिड केअर सेंटरच्या ठिकाणी पेशंट किट, साफसफाई साहित्य, डॉक्टरांचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, पीपीई किट, मास्क उपलब्ध नसल्याचे कळविले होते. तसेच, नियमाप्रमाणे दोन खाटांमध्ये आवश्यक अंतर नसणे, टॉयलेट सुविधा मानांकाप्रमाणे नसणे, आपत्कालीन ऑक्सिजन सिलिंडर, औषधे, इतर आवश्यक साहित्य उपलब्ध नसणे, अग्निशमन सुरक्षासाधने, जनरेटर बॅकअप नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर औषधांचा साठा व यादी, जैववैद्यकीय घनकचरा नोंदणी, कर्मचारी हजेरीपत्रकदेखील उपलब्ध नसल्याचे अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.

हे हि वाचलेत का….: सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील हे गृहमंत्र्यांचा भाऊ म्हणून कधीच मिरवले नाहीत… उपमुख्यमंत्री अजित पवार

‘संबंधित दोन्ही कोव्हिड केअर सेंटरमध्ये अद्यापर्यंत एकही रुग्ण दाखल झालेला नसताना डॉ. अमोल हळकुंदे यांच्यामार्फत सादर करण्यात आलेली बिले चुकीची व महापालिकेची फसवणूक करण्याच्या हेतूने सादर केली असल्याचे निदर्शनास येत आहे. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. ही महापालिकेची फसवणूक आहे. त्याकरिता डॉ. हळकुंदे दोषी आहेत. त्यांच्यावर नियमाधीन कार्यवाही प्रस्तावित करण्यात यावी,’ असा शेरा मुख्य लिपिकाने दिला आहे.

करोनाच्या काळात महापालिकेने अंदाजे २२० कोटी रुपये खर्च केले असल्याचे सांगितले आहे. करारनामा, अनामत रक्कम दिली नसतानाही कोव्हिड सेंटरला तीन कोटी रुपये दिले आहेत. सर्व व्यवहार शंकास्पद आहेत. कोव्हिड सेंटरची माहिती देण्यास टाळाटाळ केली जाते. कामाचा आदेश, कर्मचारी हजेरीपत्रकाची माहिती दिली जात नाही. सर्व प्रक्रिया चुकीची झाली असून, हा विषय दफ्तरी दाखल करण्यात यावा. कोव्हिडवरील खर्चाला आमचा विरोध नाही. चुकीच्या पद्धतीने पैसे देण्यास तीव्र विरोध आहे. जोपर्यंत संपूर्ण माहिती दिली जात नाही, तोपर्यंत पैसे देण्यास विरोध आहे.

  • राहुल कलाटे, गटनेते, शिवसेना

करारनाम्यानुसार बिले दिली जातात. मात्र, जर कोणी चुकीची बिले सादर करत असेल, तर त्याच्यावर निश्चित कारवाई केली जाईल. त्याचप्रमाणे एखाद्या ठेक्यात भाजप नगरसेवक प्रत्यक्ष सहभागी असल्याचे समोर आल्यास त्यांनाही विचारणा करण्यात येईल.

  • नामदेव ढाके, सत्तारूढ पक्षनेते
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments