Friday, June 13, 2025
Homeआरोग्यविषयकधक्कादायक….राज्यातील ९८ लाख नागरिकांनी अद्याप कोरोना लसीचा एकही डोस घेतलेला नाही

धक्कादायक….राज्यातील ९८ लाख नागरिकांनी अद्याप कोरोना लसीचा एकही डोस घेतलेला नाही

एकीकडे राज्यात फ्रंटलाईन वर्कर्स आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रिकॉशन डोस व बुस्टर डोस मिळायला सुरुवात झाली असतानाच महाराष्ट्रात करोना लशीचा एकही डोस न घेतलेल्या नागरिकांची संख्या खूपच जास्त असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या वृतानुसार राज्यातील ९८ लाख नागरिकांनी आतापर्यंत करोना लसीचा एकही डोस घेतलेला नाही. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक लसीकरण झालेले राज्य आहे. परंतु, दुसऱ्या बाजूला लोकसंख्येचा एक मोठा टप्पा लसीकरणापासून दूर राहिल्याचेही स्पष्ट झाले आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेत ऑक्सिजन लागणाऱ्या किंवा अतिदक्षता विभागात दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांपैकी बहुतांश जणांनी करोना लस घेतलेली नाही. काहीजणांनी लसीचा केवळ एकच डोस घेतलेला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व नागरिकांना लस देण्यासाठी प्रशासनाने पुन्हा एकदा जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.

करोना लस घेतलेल्या नागरिकांना सध्या करोनाची लागण होत असली तरी त्यांच्यामधील लक्षणे सौम्य आहेत. परंतु, लस न घेतलेल्या नागरिकांच्या आजाराची तीव्रता जास्त आहे. त्यामुळे करोना लस ही उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी करोना लस घ्यावी, असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले होते.

महाराष्ट्रात करोना आणि ओमिक्रॉनबाधित रुग्ण पुन्हा वाढले

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असताना, मागील दोन दिवसांपासून काहीसा रुग्णसंख्यावाढीला ‘ब्रेक’ लागला होता. मात्र, मंगळवारी (मागील २४ तासांत) करोना आणि नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ झाली. काल राज्यात ३४ ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळले आहेत. राज्य आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात मंगळवारी ३४,४२४ नवीन करोनाबाधित रुग्णांचे निदान झाले आहे. तर २२ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज १८, ९६७ रूग्ण बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६६, २१, ०७० करोनाबाधित रुग्ण बरे झाले असून, त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७५ टक्के इतके झाले आहे. राज्यात मंगळवारी (गेल्या २४ तासांत) २२ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा २. ०२ टक्के आहे.

पंतप्रधानांचा आज मुख्यमंत्र्यांशी संवाद

देशातील करोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ३० राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments