Saturday, March 22, 2025
Homeताजी बातमीशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात निधन

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात निधन

गेल्या तीन दिवसांपासून बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती खालावली होती. न्यूमोनियाचा संसर्ग झाल्यानं त्यांना पुण्यातील दिनानाथ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान आज सकाळी ५ वाजून ७ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव पर्वती येथील त्यांच्या घरी सकाळी आठ वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून दुपारी बारा नंतर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म २९ जुलै १९२२ रोजी झाला. त्यांचे मुळ नाव बळवंत मोरोपंत पुरंदरे होते. मात्र, प्रेमापोटी त्यांना बाबासाहेब असं म्हटले जाऊ लागले. बाबासाहेबांनी शिवचरित्रावर देश-विदेशात सुमारे १२ हजारांपेक्षा अधिक व्याख्यानं दिली. तर, जवळपास सात दशके त्यांनी इतिहास संशोधनाचे कार्य केले.

महाराष्ट्र सरकारने त्यांना सन २०१५ मध्ये राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र भूषण देऊन गौरव केला होता. इतिहास संशोधनात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांचा पद्मविभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला होता.

बाबासाहेब पुरंदरे यांनी ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन केले. त्याशिवाय, ललित कादंबरी लेखन, नाट्यलेखनही केले. ‘जाणता राजा’ या ऐतिहासिक गाजलेल्या नाटकाचे दिग्दर्शन केले. ‘सावित्री’, ‘जाळत्या ठिणग्या’, ‘मुजऱ्याचे मानकरी’, ‘राजा शिवछत्रपती’, ‘महाराज’, ‘शेलारखिंड’, ‘पुरंदऱ्यांचा सरकारवाडा’, ‘शनवारवाड्यातील शमादान’, ‘शिलंगणाचं सोनं’, ‘पुरंदरच्या बुरुजावरून’, ‘कलावंतिणीचा सज्जा’, ‘महाराजांची राजचिन्हे’, ‘पुरंदऱ्यांची नौबत’ आदी साहित्य प्रकाशित झाले आहे. राजा शिवछत्रपती या ग्रंथाच्या १६ आवृत्ती प्रकाशित झाल्या असून ५ लाखांहून अधिक प्रती प्रकाशित झाल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments