उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या वाहनाचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांचा सहभाग असल्याचा आरोप केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करून सगळ्या महत्त्वाच्या केसेस या त्यांच्याकडेच का सोपवल्या जातात? तसेच शिवसेनेचे मुख्यमंत्री झाल्यावर सचिन वाझे पुन्हा शासकीय सेवेत कसे रुजू होतात?,” असे सवाल उपस्थित केले आहेत.
दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “मला तसं वाटत नाही. मी त्याच्याविषयी फार बोलणं योग्य नाही. एखाद्या अधिकाऱ्याचं नाव घेऊन असं बोलणं मला योग्य वाटत नाही”.
“जर उपस्थित केलेले प्रश्न योग्य, मुद्देसूल असतील आणि त्यांच्याकडे काही माहिती असेल तर नक्कीच तपास व्हायला हवा. ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला ती घटना धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. ती आत्महत्या की हत्या याबाबतही लोकांच्या मनात शंका आहे. ती शंका लवकरात लवकर दूर होणं गरजेचं आहे. त्याच्या मृत्यूचं भांडवल करु नये. कारण ती निरपराध व्यक्त्ती आहे. त्याचा बळी कोणत्या कारणामुळे गेला आहे? त्याला कोण जबाबदार आहे? या सगळ्या गोष्टींबाबतचं सत्य जितक्या लवकर गृहखातं समोर आणेल तितकं हे या सरकारच्या प्रतिष्ठेसाठी आणि प्रतिमेसाठी योग्य ठरेल,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
“अधिवेशन सुरु असताना एका महत्वाच्या गुन्ह्यातील व्यक्ती किंवा साक्षीदाराचा मत्यू होणं हे नक्कीच धक्कादायक आहे. पण म्हणून विरोधी पक्षाने तपास पूर्ण होईपर्यंत सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं मला योग्य वाटत नाही. त्यांच्या कुटुंबाचा, पत्नीचा आक्रोश मला व्यथित करणारा आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनाही व्यथित करत असेल. त्यामुळे हे नक्की काय आहे हे बाहेर येणं गरजेचं आहे,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.