राज्यात सातत्याने वाढणाऱ्या रुग्णांच्या संख्येमुळे अखेर राज्य सरकराने “ब्रेक दि चेन” मोहिमेअंतर्गत पूर्ण लॉकडाऊन न लागू करता केवळ कडक निर्बंध लागू केले आहेत. यासोबतच शिवभोजन थाळीबाबत देखील राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी यासंदर्भातला निर्णय जाहीर केला आहे. शिवभोजन थाळी आत्तापर्यंत ५ रुपये प्रतिथाळी दरानेच दिली जात होती. याच किंमतीमध्ये शिवभोजन थाळी पार्सल पद्धतीने उपलब्ध करण्याची सुविधा राज्य सरकारने उपलब्ध करून दिली आहे.
“कोरोना काळात मजुर, कामगार, शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनतेला शिवभोजन थाळी मोठा आधार देत आहे. राज्यसरकारने लागू केलेल्या निर्बंधांमुळे सर्व हॉटेल, रेस्टॅारंट यांना पार्सल सुविधा देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता शिवभोजन केंद्रावर देखील शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात उपलब्ध होणार” असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
“कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेला थांबविण्यासाठी सरकारने “ब्रेक दि चेन” या मोहिमेअंतर्गत काही कडक निर्बंध लागू केले आहेत. या नियमांचे सर्वांनी पालन केले तरच आपण कोरोनाला रोखू शकतो. त्यामुळे सर्वांनी राज्य सरकारला सहकार्य करावे”, असे आवाहनही मंत्री भुजबळ यांनी केले आहे.