मावळातील विसापूर किल्ल्यावर मद्यपान करणाऱ्या काही तरुणांना शिवभक्तांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय. विसापूर किल्ल्याचं पावित्र्य न राखता तिथं मद्यपान करणाऱ्या तरुणांना शिवभक्तांनी कानशिलात लगावत चोप दिला. मद्यपान करणाऱ्या काही जणांना रंगेहाथ पकडण्यात आल्यानंतर त्यांना उठाबशा काढण्याची शिक्षा देण्यात आली.
अनेकदा किल्ल्यावर पर्यटनासाठी गेल्यानंतर पर्यटक किल्ल्याचं पावित्र्य राखायचं विसरून जातात. पर्यटनाच्या नावाखाली अनेकदा तरुणांकडून ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाच्या ठिकाणांवर मद्यपान, धूम्रपानासारखे प्रकार होत असल्याचं आढळते. मात्र गडकिल्ल्यांच पावित्र्य राखायला हवं असं वेध सहयाद्री ग्रुपकडून सांगत या मारहाणीचं समर्थन केलं आहे.
मावळातील विसापूर किल्ल्यावर महाराष्ट्रासह मुंबई, पुणे इथून शेकडो पर्यटक दाखल होतात. अनेकांना गडकिल्ल्यांवर जाण्यासंदर्भातील नियम माहीत असतात, तर काही जण थेट नियमांचा भंग करताना दिसतात. असाच प्रकार विसापूर किल्ल्यावर घडला आहे. वेध सहयाद्रीचा या ग्रुपमार्फत किल्ल्यावर अशोभनीय प्रकार होऊ नयेत म्हणून पहारा दिला जातोय.
मात्र काही पर्यटक नजर चुकवून असे प्रकार करताना या ग्रुपला आढलं. किल्ल्यावर मद्यपान करणे, गुटखा खाणे , सिगारेट ओढणे असे प्रकार आढळल्याने संबंधित तरुणांना काही शिवभक्तांनी कानशिलात लगावत खडे बोल सुनावले. तर काही जणांना उठाबशा काढायला लावली. गडकिल्ल्यावर पार्टी करणे, गाण्यावर नाच करणे, मद्यपान, धांगडधिंगा, असे गडकिल्ल्याचे पावित्र्य जाईल अशा गोष्टी करू नयेत असे आवाहन वेध सह्याद्री ग्रुप कडून करण्यात आले आहे.