८ जुलै २०२१,
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्व जिल्हाप्रमुखांना शिवसेना पक्ष बळकट करण्यासाठी काम करण्याचे आदेश दिले. शिवसेना पक्ष बळकट करण्यासाठी कामाला लागा, युती किंवा आघाडीची चिंता करू नका, असे आवाहन ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना केले. या बैठकीत १२ जुलै ते २४ जुलै या काळात शिवसंपर्क अभियान राबवण्याचे आदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले.
शिवसेनेच्या राज्यातील सर्व जिल्हाप्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले. या वेळी खासदार अनिल देसाई हे देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर खासदार अनिल देसाई यांनी या बैठकीबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती दिली. या बैठकीत गावागावात शिवसंपर्क अभियान सुरू करा असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख या नात्याने उद्धव ठाकरे यांनी दिले. हे शिवसंपर्क अभियान १२ जुलै ते २४ जुलै या काळात राबवण्यात येणार आहे. तसेच जनतेची कामे करा, आपला पक्ष बळकट करा, असे आदेशही ठाकरे यांनी दिल्याचे देसाई यांनी सांगितले.
यात विधानसभानिहाय, तालुकानिहाय आणि पंचायचनिहाय कामे करणे अपेक्षित आह. अधिकाधिक गावांमध्ये पोहोचत लोकांशी संपर्क वाढवण्यावर या अभियानात भर दिला जाणार आहे. महाविकास आघाडी सरकार ज्या योजना रावबत आहे, त्या योजना लोकांपर्यंत पोहोत आहेत का, याची खातरजमा करा असा आदेशही ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना दिला आहे.