महापालिका मुख्यालय घोषणांनी दणाणले; चौकशी नव्हे, थेट निलंबन आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी
पिंपरी-चिंचवड : मोशी कचरा डेपो येथे झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर शहरातील वातावरण चांगलेच तापले असून, या प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी शिवसेनेने शुक्रवारी पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयावर जोरदार आंदोलन केले. “दोषींवर कारवाई करा”, “निष्काळजी अधिकाऱ्यांना पाठीशी घालणे बंद करा” आणि “संजय कुलकर्णींना अटक करा” अशा घोषणांनी महापालिका परिसर दणाणून गेला.
मोशी येथील दुर्घटना ही नैसर्गिक नसून प्रशासनाचा हलगर्जीपणा, निष्काळजीपणा आणि नियोजनशून्य कारभाराचा परिणाम असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. या आंदोलनाचे नेतृत्व नगरसेविका सुलभा उबाळे, विश्वजित बारणे यांच्यासह शिवसेनेच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी केले.
शिवसेनेने पर्यावरण विभागाचे अधिकारी संजय कुलकर्णी यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत अटक करण्याची मागणी केली. दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाल्यास शिवसेना आणखी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
आंदोलनादरम्यान बोलताना नगरसेविका सुलभा उबाळे म्हणाल्या, “महापालिका केवळ चौकशीच्या नावाखाली वेळकाढूपणा करत आहे. नागरिकांच्या जीवापेक्षा अधिकारी आणि ठेकेदारांना संरक्षण देणारी व्यवस्था आता बंद झाली पाहिजे. दोषींना अभय देण्याचा प्रयत्न झाल्यास शिवसेना अधिक तीव्र आंदोलन करेल.”
दरम्यान, शहरात वारंवार घडणाऱ्या दुर्घटना, नागरिकांच्या सुरक्षेकडे होणारे दुर्लक्ष आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर वेळेत कारवाई न होण्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. मोशी दुर्घटनेनंतर हा रोष आणखी वाढला असून, दोषींना शिक्षा मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.
मोशी कचरा डेपो परिसरात बचावकार्य सुरू असतानाच दुसरीकडे राजकीय वातावरणही तापले आहे. शिवसेनेच्या आंदोलनामुळे प्रशासनावर कारवाईचा दबाव वाढला असून, या प्रकरणात महापालिका आणि पोलीस प्रशासन पुढे कोणती ठोस पावले उचलते, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.


