आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि शिवसेना या दोन प्रमुख मराठी पक्षांची बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित युती आज अधिकृतपणे जाहीर झाली. मुंबई येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या युतीची घोषणा केली.
राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले की, ही युती कुठल्या पक्षाला किती जागा मिळणार किंवा कुठल्या जागा मिळणार यापुरती मर्यादित नाही. “कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणांपेक्षा आपला महाराष्ट्र आणि मराठी माणूस मोठा आहे,” असे त्यांनी सांगत, ही युती मराठी माणसाचे अस्तित्व पुसून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींविरोधात असल्याचे ठामपणे मांडले.
युतीच्या जागावाटपाबाबत किंवा तांत्रिक बाबींवर आजच्या व्यासपीठावर कोणतीही माहिती देण्यात आली नाही. योग्य वेळी संबंधित नेते याबाबतची अधिकृत घोषणा करतील, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. मात्र, मुंबईचा महापौर हा शिवसेना–मनसे युतीचाच असेल आणि तो निर्विवादपणे मराठीच असेल, असा ठाम निर्धार यावेळी जाहीर करण्यात आला.
माध्यमांबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्यांमध्ये काम करणारे बहुतांश पत्रकार आणि संपादक हे मनापासून मराठी भाषेवर प्रेम करणारे आहेत. मराठी भाषा आणि मराठी माणसाच्या विरोधात सुरू असलेले षड्यंत्र त्यांनाही मान्य नाही. “यावेळी मालकांना काय वाटतं यापेक्षा तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला जे योग्य वाटतं ते निर्भीडपणे मांडा,” असे आवाहन त्यांनी पत्रकारांना केले.
ही लढाई दोन पक्षांची नसून मराठी माणसाच्या अस्तित्वाची आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात जशी माध्यमे मराठी माणसाच्या पाठीशी उभी राहिली होती, तशीच भूमिका आजही घ्यावी, असे आवाहन करत राज ठाकरे यांनी आपले भाषण संपवले.
शिवसेना–मनसे युतीच्या घोषणेमुळे मुंबईसह राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, आगामी महापालिका निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


