Sunday, September 8, 2024
Homeताजी बातमीशिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लांबणीवर; पुढील सुनावणी १३ ऑक्टोबरला

शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लांबणीवर; पुढील सुनावणी १३ ऑक्टोबरला

सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणी एका आठवड्यात सुनावणी घेण्याचे आदेश दिले होते. यामुळे या प्रकरणाचा निकाल एक ते दोन आठवड्यात लागेल, अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणी निकाल यावर्षी लागण्याची शक्यता कमी आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. निवडणुका तोंडावर असताना पुन्हा एकदा हा निकाल लांबणीवर पडल्याने याचे राजकीय पडसाद कशा पद्धतीने उमटतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर घेण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून वारंवार केली जात होती. मात्र, आता या प्रकरणाचा निकाल याच वर्षी लागणे कठीण असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राहुल नार्वेकर यांनी आज तातडीने सुनावणी बोलावली. (Big News) विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये ही सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

निकाल यावर्षी येणे कठीण

दरम्यान, या सुनावणीनंतर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल यावर्षी येणे कठीण आहे, ही बाब स्पष्ट होत आहे. संभाव्य वेळापत्रकात उलट तपासणीचा समावेश आहे. या प्रक्रियेला किमान ३ महिने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना आमदारांच्या अपात्रता प्रकरणाचा निकाल डिसेंबरपर्यंत लागणे अवघड आहे. तीन महिन्यांनंतर हे प्रकरण निकालात लागण्याची शक्यता आहे. दोन्ही गटाकडून पक्षाची महत्त्वाची कागदपत्रे आणि घटना जमा केली आहे. त्यामुळे त्या कागदपत्रांची पडताळणी, आमदारांची साक्ष आणि उलट तपासणी ही सुनावणीची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे या प्रत्यक्ष सुनावनीनंतर तातडीने निर्णय देणे कठीण आहे.

दरम्यान, सुप्रीम कोर्टात या प्रकरणी दोन आठवड्यानंतर सुनावणी आहे. या सुनावणीवेळी विधानसभा अध्यक्षांना सुप्रीम कोर्टात अहवाल द्यावा लागणार आहे. शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणात आतापर्यंत काय-काय कारवाई केली, आमदारांची साक्ष कशा प्रकारे नोंदवण्यात आली, या विषयीचा अहवाल विधानसभा अध्यक्ष सुप्रीम कोर्टात सादर करतील. याच प्रकरणी दोन आठवड्यांत सुप्रीम कोर्टातही सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे आगामी काळात काय-काय घडतं, ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments