२४ नोव्हेंबर २०२०,
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घऱी सकाळी ईडीचं पथक दाखल झालं असून शोधमोहीम सुरु आहे. मुंबई तसंच ठाणे परिसरातील एकूण १० ठिकाणी ईडीकडून शोधमोहीम सुरु आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी तसंच कार्यालयांमध्ये सकाळी ईडीचं पथक दाखल झालं होतं. प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचं पथक पोहोचलं होतं. त्यानंतर ईडीने विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतलं असल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. विहंग सरनाईक यांना घेऊन ईडीचं पथक रवाना झालं आहे. त्यांना चौकशीसाठी मुंबईला नेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.
या संदर्भात ईडीने कोणतीही नोटीस दिली नसल्याचं शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे. सध्या प्रताप सरनाईक हे मुंबई बाहेर आहेत. त्यांच्या मालकीच्या 10 विविध जागांवर या धाडी टाकल्याचं ईडीकडून सांगितलं जात आहे.
सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयांवर सकाळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापे मारल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, हे छापे नसून, केवळ झाडाझडती आहे, असे ईडीने स्पष्ट केले आहे. एका प्रकरणात केवळ धागेदोरे हाती लागल्याने हे सर्च ऑपरेशन राबवले आहे, असे सांगण्यात येत आहे, ईडीने इंडियन एक्स्पेसला दिलेल्या माहितीनुसार, टॉप्स ग्रुपचे प्रमोटर आणि संबंधित सदस्यांची शोधमोहिम सुरु आहे. यामध्ये काही राजकारण्यांचाही समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर ही कारवाई केली जात आहे.