मानवी जीवनात ज्ञान, मोक्ष, त्याग, उपवास, तप आणि जप याचे महत्त्व अधोरेखित करणारी तसेच शिव-शक्ती आणि शिव- महिमा याची प्रचिती देणारे शिव चरित्र पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील भाविक-भक्तांना श्रवण करता यावे. यासाठी श्री अष्टविनायक शिव महापुराण कथा भक्ती सोहळ्याचे आयोजन केले आहे, अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिली.
लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवारच्यावतीने श्री अष्टविनायक शिवमहापुराण कथेचे आयोजन दि. १५ ते २१ सप्टेंबर २०२३ दरम्यान दुपारी २ ते ५ या वेळेत पीडब्ल्यूडी मैदान, नवी सांगवी येथे केले आहे. परमपूज्य पंडित प्रदीप मिश्रा यांच्या सुश्राव्य वाणीतून हा अभूतपूर्व अध्यात्मिक सोहळा रंगणार आहे. हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा शिव पुराण कथा मोफत वाचन सोहळा आहे.यावेळी माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समितीचे माजी सभापती राजेंद्र राजापूरे, विलास मडिगेरी, निर्माल्य सेवा ट्रस्टचे श्री.रामकृष्ण यादव आदी उपस्थित होते.
शंकर जगताप म्हणाले की, मध्यप्रदेश येथील प. पु. पंडित प्रदीप मिश्रा यांच्या अमोघ वाणीतून ही कथा ऐकण्याची संधी पिंपरी-चिंचवडवासीयांना मिळणार आहे. पंडित मिश्रा यांचे लाखो अनुयायी कथेचे श्रवण करण्यासाठी येणार आहेत. या दिवसांमध्ये सुमारे आठ ते नऊ लाख श्रोते या कथेचे श्रवण करतील. त्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. आलेल्या भाविकांसाठी प्रशस्त व्यवस्था केली आहे. पार्किंग, सुसज्ज बैठक व्यवस्था, स्वच्छतागृह, रुग्णवाहिका, प्रथमोपचार सुविधा, जेवन, नाष्टा, शुद्ध पिण्याचे पाणी, अग्निशमन यंत्रणा, स्वच्छता नियोजन, सुरक्षा, पोलीस बंदोबस्त, भाविकांची निवास व्यवस्था, आपतकालीन व्यवस्था अशी जय्यत तयारी केली आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून शिवभक्त या कथा वाचन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता भव्य मंडप व संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी श्री शिव महापुराण कथा आयोजन समिती गठीत केली आहे.
पंडित प्रदीप मिश्रा यांच्याबाबत माहिती…
प. पु. पंडित प्रदीप मिश्रा हे मध्यप्रदेश सिहोर येथील आहेत. त्यांचा जन्म १९८० मध्ये झाला असून, त्यांची आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथा वाचक म्हणून अध्यात्मिक क्षेत्रात ओळख आहे. भगवान महादेवाची शिव महापुराण कथा लोकांपर्यंत पोहोचवावी आणि त्यातून लोकांना चांगल्या मार्गावर जगण्याची प्रेरणा मिळावी, या उद्दात्त हेतूने कार्य करीत आहेत. त्यांचे लाखो अनुयायी आहेत. ‘आस्था’ या अध्यात्मिक वाहिनीवर त्यांच्या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण होते. शिव पुराण कथेसोबतच मानवी जीवनात येणाऱ्या समस्यांवर मार्गही ते सांगतात. त्यामुळे त्यांच्या कथा वाचन कार्यक्रमांना मोठी गर्दी होते. विशेष म्हणजे, सनातन धर्माबाबत प्रचंड अभिमान असलेले अध्यात्मिक गुरू म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो.
अध्यात्मिक अनुभवाची मोफत पर्वणी…
भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता भव्य मंडप व संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी श्री शिव महापुराण कथा आयोजन समिती गठीत केली आहे. या समितीच्या बरोबरीने नियोजनासाठी २५ समित्यांची स्थापना करण्यात आलीं आहे. या समित्यांकडे सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या आहेत. हा संपूर्ण अध्यात्मिक सोहळा नागरिकांसाठी मोफत आहे. कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व समाजातील धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते, खेळाडू अशा सर्वांना निमंत्रित करण्यात आले आहे.
भाविकांसाठी भव्य मंडप…
सभा मंडप येथे आगामी सात दिवसात भाविकांचा मोठा राबता असणार आहे. यासाठी सुसज्ज असा सभामंडप बांधण्यात आला असून यामध्ये सुमारे १ लाख भाविक एका वेळी बसून कथा ऐकू शकतील. तसेच आजूबाजूला देखील मिळून सुमारे ५० हजार म्हणजे एकून १.५ लाख लोक एकावेळी कथेचा आस्वाद घेवू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे ५ ते १० हजार भाविकांचे ‘एक ब्रॅकेट्स’ अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे भाविकांची एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही. तसेच अँब्युलन्स थेट मंचापर्यंत जावू शकेल अशा प्रकारे मंडपाची बांधणी करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला येणारे सुमारे १५ ते २० हजार भाविक हे सभामंडपात मुक्कामी असतात. अशा भाविकांसाठी मैदानाच्या एकाबाजूला सुमारे ३०० शौचालयांची देखील व्यवस्था करण्यात आलीं आहे. याबरोबरीने पिण्याच्या तसेच वापरण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.