बुलढाण्यातील समृद्धी महामार्गावर बसचा भीषण अपघात होऊन २६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये वर्ध्याच्या २६ वर्षांच्या अवंती पोहनेकरचाही मृत्यू झाला आहे. ती इंजिनीअर असून पुण्याला नोकरीसाठी जात होती. मात्र, वाटेत तिला मृत्यूने गाठलं.
ओडिशा येथील बालासोर रेल्वे अपघाताच्या आठवणी ताज्या असतानाच आता राज्यातील बुलढाणा येथील समृद्धी महामार्गावर एका बसला भीषण अपघात झाला. यावेळी बस उलटून डिझेल टँक फुटल्याने बसला आग लागली आणि झोपेतच २६ जणांचा जळून कोळसा झाला. या अपघातात अनेकांनी आपली मुलं, नातेवाईक गमावली. तर काहींचं अख्खं कुटुंब गेलं. यापैकीच अवंती पोहनेकर (वय २६) ही तरुणीही एक होती. तिचाही या अपघातात होरपळून मृत्यू झाला आहे. तिच्या अशा अकाली जाण्याने तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
अवंती पोहनेकर ही वर्ध्याची असून ती इंजिनीअर होती, ती पुण्यासाठी शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास निघाली. त्यानंतर मध्यरात्री बुलढाणा येथील समृद्धी महामार्गावर हा भीषण अपघात झाला. ज्यामध्ये तिचा होरपळून मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच अवंतीच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. आपल्या मुलगी ठीक असेल ना, तिला काही झालं तर नसेल या भीतीने त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. मला अवंतीजवळ घेऊन चला असं म्हणत त्यांनी टाहो फोडला. त्या माऊलीला तर हे देखील माहिती नाही की तिची अवंती आता या जगात नाही. ती तिला सोडून गेलीये.
पुण्यासाठी निघाली होती अवंती
अवंतीच्या वडिलांचं ती लहान असतानाच निधन झालं. त्यानंतर तिची आई प्रणिता यांनीच अवती आणि तिची बहीण मोनू यांचा सांभाळ केला. प्रणिता या मेघे विद्यापिठात कार्यरत असल्याची माहिती आहे. आईची प्रकृती बरी नसते म्हणून अवीती परदेशी गेली नाही. तिने एक मॉडेल म्हणून खूप प्रसिद्धीही मिळवल्याची माहिती आहे. ती नोकरीच्या निमित्तानेच पुण्याला जात होती. पण, वाटेत अनर्थ घडला.
३३ पैकी २६ जणांचा मृत्यू
बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या विदर्भ एक्सप्रेसच्या बसला शनिवारी मध्यरात्री १ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास भीषण अपघात झाला. या बसमधून ३३ प्रवासी प्रवास करत होते. ३३ पैकी केवळ ७ जणांना जीव वाचला असून इतर २६ जणांचा बसला लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू झाला आहे.
ही दुर्दैवी घटना बुलढाण्याच्या सिंदखेडा येथील पिंपळखुटा भागात घडली. अपघातात बस चालक आणि बस क्लिनर बचावले आहेत. बसमध्ये अधिकतर प्रवासी नागपूरमधले, तर काही वर्धा आणि यवतमाळचे असल्याची माहिती आहे. ही विदर्भ ट्रॅव्हल्सची एसी स्लीपर कोच बस होती. शुक्रवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास ही बस नागपूरवरुन पुण्यासाठी निघाली होती.
समृद्धी महामार्गावर एका लोखंडी खांबाला ही बस धडकली आणि त्यानंतर ती दुभाजकावर जाऊन आदळली. त्यानंतर बस लोखंडी खांबापासून १०० फूट दूर जाऊन उलटली. बस पलटी झाल्याने डिझेल टँक फुटला आणि बसला आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. ड्रायव्हरने बसचे टायर फुटल्याचीही माहिती दिली आहे.