१४ ऑक्टोबर २०२१,
१०० नामवंत मान्यवरांकडून अभिनव वग्विलासिनी शांताबाई शेळके यांना त्यांच्याच १०० कवितांमधून मानवंदना, अशी संकल्पना असलेल्या अभिनव उपक्रमाचे उदघाटन प्रसिद्ध कवी, लेखक प्रविण दवणे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
निमित्त होते, अष्टपैलू व्यक्तिमत्व शांताबाई शेळके यांची जन्मशताब्दी.
महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड ने आयोजित केलेल्या जन्मशताब्दी सोहळ्याचे अध्यक्षस्थान संत साहित्याचे गाढ़े अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी भुषविले. प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध गायिका अनुराधा मराठे, प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, मसाप पुणे चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी तसेच व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड चे अध्यक्ष राजन लाखे, कार्याध्यक्षा विनीता ऐनापुरे, डॉ रजनी शेठ उपस्थित होते. गायिका प्रांजली बर्वे यांनी गायिलेल्या शांताबाई लिखित ” जय शारदे वागेश्वरी या स्वागत गीताने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
सदर जन्म शताब्दी वर्षांत महाराष्ट्रातील तसेच बृहन्महाराष्ट्रातील साहित्य, संगीत, नाट्य, चित्रपट, शैक्षणिक, तसेच साहित्यात रुची असलेले राजकीय मान्यवर आणि शांताबाईंचा सहवास लाभलेले नामवंत मान्यवरांचा समावेश आहे. आजपर्यंत. डॉ. श्रीपाल सबनीस, प्रवीण दवणे, डॉ. न. म. जोशी, रामदास फुटाणे, प्रशांत दामले ,आशा काळे, सुवर्णा माटेगावकर, मा. गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, उल्हासदादा पवार, आमदार मेधा कुलकर्णी अशा सर्व क्षेत्रातील एकुण २७ मान्यवरांनी शांताबाईं च्या कविता सादर करून त्यांना आदरांजली वाहिली.
सदर कार्यक्रमात प्रविण दवणे, सुधीर गाडगीळ, मिलिंद जोशी, रामचंद्र देखणे यांनी आपली मनोगते व्यक्त करुन शांताबाईंच्या आठवणींना उजाळा दिला. गायिका अनुराधा मराठे यांनी आपल्या मनोगतात शांताबाईं चे काव्य ” ही वाट दूर जाते ” हे गाणे सादर करुन रसिकांना शांताबाईच्या काव्य विश्वात रममाण केले.
यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड च्या ” यू ट्यूब चनेल ” चे उदघाटन प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते झाले. १०० मान्यवरांनी सांगितलेल्या त्यांच्या आठवणी व सादर केलेल्या १०० कवितांचा कायम स्वरुपी ठेवा मसाप पिंपरी चिंचवड चनेल वर उपलब्ध होणार असल्याचे राजन लाखे यांनी सांगितले.
सीमा गांधी यांनी सुत्रसंचालन केले. विनीता ऐनापुरे यांनी आभार मानले. जालिंदर राऊत, अजित कुमठेकर, संजय जगताप, किरण लाखे, किशोर पाटील, माधुरी मंगरूळकर यांनी संयोजन केले.