चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे. जगताप कुटुंबातच उमेदवारी द्यावी असे आमचे म्हणणे नाही. उमेदवारीबाबत पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य राहील असे शंकर जगताप म्हणाले आहेत. ते पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपा पदाधिकाऱ्यांची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली. बैठकीत दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप, बंधू शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.
भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे नुकतेच निधन झाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक जाहीर केली असून विविध पक्षांनी पोटनिवडणूक लढवण्यावरून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. भाजपाकडून दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप आणि बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी मिळण्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यावर शंकर जगताप यांनी त्यांची भूमिका मांडली. ते म्हणाले की, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत उमेदवारी संदर्भात काही ठरलेलं नाही. जगताप कुटुंबीय हे भाजपावर प्रेम करणारे कुटुंब आहे.
दिवंगत लक्ष्मण जगताप यांनी शेवट पर्यंत पक्षनिष्ठा जपली. विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीवेळी मतदानासाठी लक्ष्मण जगताप हे मतदानासाठी गेले होते. पक्षनिष्ठा काय हे त्यांनी दाखवून दिले. आम्ही अद्याप दुःखातून सवरलेलो नाहीत. घरात कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही. पक्षाने आम्हाला बैठकीला बोलावले म्हणून आलो आहोत. आमच्या जगताप कुटुंबात उमेदवारी तिकीट द्यावं हे आमचे म्हणणं नाही. आम्ही पक्षाच्या पाठीमागे आहोत. पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल. असे शंकर जगताप म्हणाले आहेत.