Friday, September 29, 2023
Homeआंतरराष्ट्रीयसीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांना ‘एशियन ऑफ दी इयर’...

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांना ‘एशियन ऑफ दी इयर’ पुरस्कार जाहीर

५ डिसेंबर २०२०,
पुण्यातील ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे सीईओ अदर पुनावाला यांना ‘एशियन ऑफ दी इयर’ पुरस्कार जाहीर झाला आहे. सिंगापूरचं आघाडीचं वृत्तपत्र ‘दी स्ट्रेट्स टाइम्स’कडून हा पुरस्कार दिला जातो. आशियातील सहा व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड झाली असून यात पुनावाला यांच्या नावाचा समावेश आहे. करोना महामारीविरोधातील लढ्यात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

जगातील सर्वात मोठी लस निर्मिती कंपनी असलेल्या ‘सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने’ ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटिश-स्वीडिश फार्मा कंपनी अस्ट्रा झेनेका यांच्या सहकार्याने कोविड-१९वर ‘कोविशिल्ड’ नावाने लस विकसित केली आहे. भारतात सध्या या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु आहे.

वृत्तपत्र ‘द स्ट्रेट्स टाइम्स’कडून दिल्या जाणाऱ्या ‘एशियन ऑफ दी इयर’ पुरस्कारासाठी अदर पुनावाला यांच्याव्यतिरिक्त चिनी संशोधक झँग योंगझेन यांचा समावेश आहे. झँग यांनी आपल्या टीमसह Sars-CoV-2 विषाणूचा जिनोम सर्वप्रथम शोधून काढला आणि याबाबत ऑनलाइन माहिती प्रसिद्ध केली होती. त्यानंतर चीनचे मेजर जनरल चेन वेई, जपानचे डॉ. रुईची मोरिशिटा आणि सिंगापूरचे प्रा. ओई एंग एओंग यांचाही या यादीत समावेश आहे, या सर्वांनी लस निर्मितीत मोठे काम केले आहे. दक्षिण कोरियाचे उद्योगपती सिओ जुंग जिन यांच्या कंपनीने लस तयार करुन वितरणाची जबाबदारी घेतली असून त्यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे. या सर्वांचा उल्लेख ‘व्हायरस बस्टर्स’ असा करण्यात आला आहे.

या पुरस्काराच्या मानपत्रात म्हटलं की, Sars-Cov-2 विषाणूने अनेक बळी घेतले आहेत. जगातील जनजीवन ठप्प केले. अशावेळी सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या आशिया खंडातील या ‘व्हायरस बस्टर्स’नी चांगले काम केले आहे. त्यांच्या धैर्याला व सर्जनशीलतेला आमचा सलाम. या अडचणीच्या काळात त्यांनी आशिया हा आशेचा किरण असल्याचे दाखवून दिले.

‘दी स्ट्रेट्स टाइम्स’च्या परदेश विभाग संपादक भाग्यश्री गारेकर यांनी सांगितलं की, “आज एकही दिवस करोनाच्या उल्लेखाशिवाय जात नाही. आम्ही ज्यांची निवड केली आहे ते सर्वजण या सन्मानास पात्र आहेत. आशियातील सर्वात मोठ्या आरोग्य आव्हानाला तोंड देण्यात त्यांनी मदत केली आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments