मुलीसाठी आणलेल्या पेस्ट्रीमध्ये आढळला कठीण तुकडा; दुकानदाराला जाब विचारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी :
थरमॅक्स चौकातील एका नामाकिंत केक शॉपमधून खरेदी केलेल्या चॉकलेट पेस्ट्रीमध्ये काचेप्रमाणे दिसणारा कठीण तुकडा आढळल्याचा गंभीर आरोप एका ग्राहक महिलेने केला आहे. मुलीसाठी खरेदी केलेली पेस्ट्री खात असताना हा प्रकार लक्षात आल्याचे संबंधित महिलेचे म्हणणे आहे.
पेस्ट्री खाताना आढळला संशयास्पद तुकडा
महिलेच्या म्हणण्यानुसार, पेस्ट्री खात असताना तोंडात आलेला छोटा, कठीण आणि काचेप्रमाणे दिसणारा तुकडा तिच्या लक्षात आला. त्यानंतर तिने पेस्ट्री खाणे थांबवले. सुदैवाने हा तुकडा गिळला गेला नसल्याने संभाव्य धोका टळला. मात्र, लहान मुलांसाठी खरेदी केलेल्या खाद्यपदार्थात अशा प्रकारचा तुकडा आढळल्याने महिलेने संताप व्यक्त केला.
दुकानदाराला जाब विचारतानाचा व्हिडिओ व्हायरल
या प्रकारानंतर संबंधित मुलीच्या आईने केक शॉपमध्ये जाऊन दुकान मालकाकडे याबाबत जाब विचारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये संबंधित महिला पेस्ट्रीमध्ये आढळलेल्या तुकड्याबाबत दुकान मालकाकडे स्पष्टीकरणाची मागणी करताना दिसत आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खाद्यपदार्थांच्या गुणवत्ता आणि सुरक्षिततेबाबत सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. विशेषतः लहान मुले केक, पेस्ट्री आणि अन्य बेकरी पदार्थांचे सेवन करत असल्याने अशा प्रकारांची गांभीर्याने दखल घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
अन्नसुरक्षा विभागाच्या तपासणीची मागणी
खाद्यपदार्थांमध्ये कोणत्याही प्रकारची परकी वस्तू जाणे ही गंभीर बाब मानली जाते. त्यामुळे संबंधित पेस्ट्रीचा नमुना तपासून त्यामध्ये आढळलेला तुकडा नेमका कशाचा आहे, याची सत्यता स्पष्ट करावी. तसेच संबंधित केक शॉपमध्ये खाद्यपदार्थांची निर्मिती, हाताळणी, पॅकिंग आणि साठवणूक करताना आवश्यक अन्नसुरक्षा नियमांचे पालन केले जाते की नाही, याची तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, पेस्ट्रीमध्ये आढळलेला तुकडा प्रत्यक्षात काचेचाच आहे की अन्य कोणत्या पदार्थाचा, याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. त्यामुळे ग्राहक महिलेने केलेल्या आरोपांची सत्यता अधिकृत तपासणी आणि नमुना परीक्षणानंतरच स्पष्ट होणार आहे.


