पिंपरी-चिंचवड | प्रतिनिध
मोरेवस्ती, चिखली येथील भीमशक्तीनगर SRA प्रकल्पातील पात्रता-अपात्रता यादी, संमतीपत्रे आणि सर्वेक्षण प्रक्रियेवर स्थानिक नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मारुती गणपत जाधव यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी २१ सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्याकडे निवेदन दिले आहे.
भीमशक्तीनगर SRA प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या प्राथमिक सर्वेक्षणानंतर प्रसिद्ध झालेल्या पात्रता-अपात्रता यादीमध्ये अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या काही स्थानिक झोपडीधारकांना अपात्र ठरविल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत असल्याचे जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे. त्याचवेळी प्रत्यक्ष स्थानिक रहिवासी नसलेल्या व्यक्तींची किंवा संबंधित व्यक्तींच्या नातेवाईकांची नावे यादीत समाविष्ट झाल्याचे आरोपही करण्यात येत असल्याने संपूर्ण यादीची प्रत्यक्ष पडताळणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
SRA प्रकल्पासाठी घेण्यात आलेल्या संमतीपत्रांबाबतही नागरिकांकडून आक्षेप नोंदविले जात असल्याचे जाधव यांनी नमूद केले. काही नागरिकांवर दबाव आणून किंवा आर्थिक आमिष दाखवून संमतीपत्रे घेतल्याचे आरोप होत असल्याने संबंधित संमतीपत्रांची सत्यता आणि ती घेण्याची प्रक्रिया तपासण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
प्रत्येक संमतीपत्रासोबत संबंधित झोपडीधारकाची ओळख, प्रत्यक्ष ताबा, वास्तव्य, उपलब्ध कागदपत्रे तसेच स्वाक्षरी अथवा अंगठ्याची स्वतंत्र पडताळणी करण्यात यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
बायोमेट्रिक पद्धतीने फेरसर्वेक्षणाची मागणी
भीमशक्तीनगर SRA प्रकल्पाचे पुन्हा बायोमेट्रिक फेरसर्वेक्षण करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी जाधव यांनी केली आहे. हे सर्वेक्षण SRA प्राधिकरण आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संयुक्त पथकाद्वारे करण्यात यावे, अशीही मागणी आहे.
फेरसर्वेक्षणावेळी प्रत्येक झोपडीधारकाची प्रत्यक्ष उपस्थिती, झोपडीचे अचूक ठिकाण, वास्तव्याचा पुरावा, उपलब्ध कागदपत्रे तसेच प्रकल्पाला दिलेली संमती किंवा विरोध यांची नोंद करण्यात यावी. संपूर्ण सर्वेक्षणाचे व्हिडिओ चित्रीकरण केल्यास भविष्यातील वाद टाळण्यास मदत होईल, असे जाधव यांनी म्हटले आहे.
अंतिम आराखड्यापूर्वी रहिवाशांना विश्वासात घ्या
प्रकल्पाचा अंतिम आराखडा मंजूर करण्यापूर्वी स्थानिक झोपडीधारकांना पुनर्वसनाचा आराखडा, घरांचे क्षेत्रफळ, इमारतींची संख्या, पुनर्वसनाची जागा आणि उपलब्ध सोयी-सुविधांची स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. पात्र झोपडीधारकांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांच्या सहभागातूनच पुढील प्रक्रिया राबवावी, अशी भूमिका जाधव यांनी मांडली आहे.
“भीमशक्तीनगर SRA प्रकल्प हा स्थानिक नागरिकांच्या भवितव्याशी संबंधित विषय आहे. पात्र-अपात्र यादीपासून संमतीपत्रांपर्यंत संपूर्ण प्रक्रियेची पारदर्शकपणे पडताळणी होणे आवश्यक आहे. कोणताही पात्र झोपडीधारक अन्यायाने वंचित राहू नये आणि अपात्र व्यक्तीला लाभ मिळू नये, यासाठी बायोमेट्रिक पद्धतीने फेरसर्वेक्षण करून वस्तुस्थिती समोर आणावी,” अशी भूमिका मारुती गणपत जाधव यांनी व्यक्त केली.
दरम्यान, नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन चौकशी आणि बायोमेट्रिक फेरसर्वेक्षण करण्यात आले नाही, तर नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी वेळ पडल्यास न्यायालयीन मार्गाचा अवलंब करणार असल्याचेही जाधव यांनी स्पष्ट केले आहे.
आता शासन आणि संबंधित प्राधिकरण या तक्रारींची कशी दखल घेतात, भीमशक्तीनगर SRA प्रकल्पाची फेरपडताळणी होते का आणि बायोमेट्रिक फेरसर्वेक्षणाबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.


