Saturday, March 2, 2024
Homeअर्थविश्वसेन्सेक्स प्रथमच ६० हजारांवर, गुंतवणूकदारांची जोरदार कमाई..

सेन्सेक्स प्रथमच ६० हजारांवर, गुंतवणूकदारांची जोरदार कमाई..

२४ सप्टेंबर २०२१,
भांडवली बाजारात आज मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने प्रथमच ६० हजार अंकाचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला. या तेजीतून जोरदार कमाई करणाऱ्या गुंतवणूकदारांनी आज बाजारात अक्षरश: दिवाळी साजरी केली. आज शुक्रवारी बाजार सुरु होताच सेन्सेक्सने ३६६ अंकाची झेप घेत ६०२५१ अंकाची विक्रमी पातळी गाठली. निफ्टी देखील १०९ अंकांच्या वाढीसह १७९३१ अंकापर्यंत पोहोचला आहे.

मागील आठवडाभरात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी वाढ झाली आहे. अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने लवकरच बॉण्ड खरेदी बंद करण्याचे संकेत दिले आहेत. व्याजदर वाढवणार असल्याचे बँकेने म्हटलं आहे. त्यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्था आता पूर्णपणे सावरली असल्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच आठवड्याच्या सुरुवातीला चीनमधील एव्हरग्रँडे या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या कंपनीला चिनी सरकारने मदतीची तयारी दर्शवली आहे. याचाही सकारात्मक परिणाम जगभरातील भांडवली बाजारांवर झाला असल्याचे शेअर बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे.

आजच्या सत्रात वित्तीय सेवा संस्था, रियल इस्टेट कंपनी, एफएमसीजी, टेलिकॉम, आयटी सेवा, बँका, ऑटो या क्षेत्रात खरेदीचा ओघ आहे. निफ्टी मंचावर इन्फोसिसच्या शेअरमध्ये सर्वाधिक २.३८ टक्के वाढ झाली आहे. तसेच आयटी सेवेतील विप्रो, टीसीएस, एचसीएल टेक, टेक महिंद्रा यांच्यासह एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक, एशियन पेन्ट्स या शेअरमध्ये वाढ झाली आहे.

सध्या सेन्सेक्स ३१० अंकांनी वाढला असून तो ६०१९५ अंकावर आहे. निफ्टी ८८ अंकांच्या वाढीसह १७९१० अंकावर आहे. कालच्या सत्रात बाजार बंद होताना सेन्सेक्स ९५८ अंकाने वधारून ५९८८५ अंकावर बंद झाला. निफ्टी २७६ अंकांनी वधारून १७८२२ अंकावर स्थिरावला होता. या तेजीने गुंतवणूकदारांच्या मालमत्तेत ३ लाख कोटींची वाढ झाली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments