४ ऑगस्ट २०२१,
शेअर बाजारातील तेजीच्या लाटेवर स्वार झालेल्या सेन्सेक्स आणि निफ्टीने आज बुधवारी आपली घोडदौड कायम ठेवली आहे. आज बाजार सुरु होताच झालेल्या चौफेर खरेदीने सेन्सेक्स ५०० अंकांनी वधारला आणि ५४ हजार अंकाच्या पातळीवर गेला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने १३० अंकाची झेप घेतली आहे. आजच्या तेजीने सलग दोन सत्रात गुंतवणूकदारांनी तीन लाख कोटींची कमाई केली आहे.
आजच्या सत्रात बँक, वित्त संस्था, आयटी, ऑटो, एफएमसीजी, रियल्टी या क्षेत्रात खरेदीचा ओघ वाढला आहे. सेन्सेक्स मंचावरील २३ शेअर तेजीत आहेत. ज्यात टाटा स्टील, एचडीएफसी, इन्फोसिस, डॉ. रेड्डी लॅब, आयसीआयसीआय बँक, पॉवरग्रीड, एचडीएफसी बँक, कोटक बँक, रिलायन्स, एनटीपीसी, बजाज फायनान्स, टायटन, आयटीसी, ऍक्सिस बँक, इंडसइंड बँक, महिंद्रा अँड महिंद्रा या शेअरमध्ये वाढ झाली आहे. एचयूएल, एसबीआय, टेक महिंद्रा,नेस्ले, भारती एअरटेल या शेअरमध्ये घसरण झाली आहे.
निफ्टीवर सर्वच क्षेत्रीय निर्देशांकात घसरण झाली आहे. आज एसबीआय, टायटन, गोदरेज कंझुमर प्रॉडक्ट, हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होणार आहेत. जुलै महिन्यात जीएसटी करात झालेली दमदार वाढ आणि औद्योगिक उत्पादनाने झेप घेतल्यानंतर गुंतवणूकदारांचा अर्थव्यवस्थेवरील विश्वास दुणावला असल्याचे जाणकांचे मत आहे.
आज देवयानी इंटरनॅशनल, क्रस्ना डायग्नोस्टिक, विंडलॅब बायोटेक आणि एक्झारो टाईल्स या कंपन्यांचे आयपीओ खुले होणार आहेत. त्यामुळे आज प्राथमिक बाजारात देखील गुंतणूकदारांना खरेदीचे अनेक पर्याय उपलब्ध होतील.चलन बाजारात मंगळवारी डॉलरच्या समोर रुपया ६ पैशांनी वधारला आणि तो ७२.२८ वर गेला. शेअर बाजारातील तेजीचा ट्रेंड पाहता डिसेंबरअखेर निफ्टी १८००० अंकांपर्यंत मजल मारेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. सध्या सेन्सेक्स ४८९ अंकांनी वधारला असून तो ५४३१२ अंकावर आहे. निफ्टी १३७ अंकांनी वधारला असून तो १६२६७ अंकावर आहे.
मंगळवारी केली २.३० लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात मंगळवारी गुंतवणूकदारांनी जोरदार कमाई केली आहे. काल सेन्सेक्स ८७३ अंकांनी वधारला. तर निफ्टीने १६००० अंकांचा टप्पा ओलांडला. या तेजीच्या लाटेत गुंतवणूकदारांची एकूण मालमत्ता २.३० लाख कोटींनी वधारली.


