Monday, April 22, 2024
Homeअर्थविश्वसलग तिसऱ्या दिवशी सेन्सेक्स मध्ये घसरण; सेन्सेक्स ४७ हजारांखाली

सलग तिसऱ्या दिवशी सेन्सेक्स मध्ये घसरण; सेन्सेक्स ४७ हजारांखाली

२८ जानेवारी २०२१,
भांडवली बाजारात महिन्यातील वायदापूर्तीचे अखेरचे व्यवहार होण्याच्या दिवशीच शेअर बाजाराने जोरदार आपटी खाल्ल्याचे चित्र दिसत आहे. डिसेंबरनंतर पहिल्यांदाच शेअर बाजारातील व्यवहार ४७ हजारांखाली सुरु झालाय. बुधवारी बाजार बंद होताना सेन्सेक्समध्ये घसरण झाल्यानंतर आज बाजारातील व्यवहार सुरु झाल्यानंतरही तोच ट्रेण्ड दिसून आला. सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी गडगडला. बुधवारी ४७,५०० ला बंद झालेला सेन्सेक्स आज बाजार सुरु झाला तेव्हा ४७ हजारांहून अधिक खाली होता. निफ्टीही १३ हजार ८०० पर्यंत गडगडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

प्री ओपनिंग सेशन्समध्येच सेन्सेक्स ७०० अंशांहून अधिक पडल्याचे चित्र दिसत होतं तर निफ्टीही २०० हून अधिक अंकांनी पडला. गुंतवणूकदारांनी हात आखडता घेतल्याने बाजाराने मोठी आपटी खाल्ल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. अमेरिकन बाजारपेठेमध्ये सोन्याचे भावही गडगडले असून त्याचा परिणामही शेअर बाजारातील गुंतवणुकीवर झाल्याचे कोटक महिंद्रा सिक्युरिटीजचे रविंद्र राव यांनी म्हटलं आहे. बाजारातील अस्थितरता कायम राहण्याची शक्यता सध्या व्यक्त केली जात आहे.

सेन्सेक्समधील प्रमुख ३० कंपन्यांपैकी २६ कंपन्यांचे समभाग घसरणीत असल्याचे चित्र बाजारातील व्यवहार सुरु झाल्यानंतर दिसत आहे. सन फार्मा, एचडीएफसी आणि डॉक्टर रेड्डीजला बाजारातील व्यवहार सुरु झाल्यानंतरच मोठा फटका बसला. अव्वल तीसपैकी केवळ चार कंपन्यांचे निर्देशांक सकारात्मक होते. यामध्ये ओएनजीसी, एटीपीसी, एशियन पेंट्स आणि मारुती सुझुकी इंडिया या चार कंपन्यांच्या समावेश आहे.

“जागतिक स्तरावर सर्वच शेअर बाजारांची परिस्थिती नाजूक दिसत आहे. अमेरिकन शेअर बाजारातील ट्रेण्ड्समुळे हे असं होतं आहे. अमेरिकन बाजारपेठेतील काही क्षेत्रांमधील गुंतवणुकीसंदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे. भारतामध्येही सलग तिसऱ्या दिवशी शेअरबाजार नकारात्कम आहे. अर्थसंकल्पासंदर्भात संभ्रम असल्याने बाजाराचा ट्रेण्ड बुलीश (घसरण होण्याकडे) आहे. बाजारात सध्या गोंधळाचं वातावरण आहे,” असं जीओजीत फायन्सास सर्व्हिसेसमधील मुख्य गुंतवणूक सल्लागार असणाऱ्या व्ही. के. विजयकुमार यांनी फायनॅनशियल एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं आहे.

महिन्यातील वायदापूर्ती एक दिवसावर तर आगामी वर्षांचा अर्थसंकल्प चार दिवसांवर येऊन ठेपला असताना वरच्या टप्प्याला असलेल्या भांडवली बाजारात नफावसुलीचा दबाव बुधवारीच शिगेला पोहोचला. विदेशी गुंतवणूकदारांच्या पुढाकाराने बाजारात वाढलेल्या विक्रीझोताने प्रमुख निर्देशांक एकाच व्यवहारात तब्बल २ टक्क्य़ांनी आपटले. परिणामी सेन्सेक्स बुधवारी व्यवहार बंद होताना ४७,५०० तर निफ्टीने लक्षणीय असा १४ हजाराचा स्तरही सोडला होता. आजप्रमाणे बुधवारीही सुरुवातीपासूनच्या सत्रात घसरण अनुभवणारा मुंबई निर्देशांक सत्रात हजारहून अंशांनी आपटल्यानंतर दिवसअखेर सोमवारच्या तुलनेत तब्बल ९३७.६६ अंशांनी खाली येत ४७,४०९.९३ वर स्थिरावला. तर २७१.४० अंश आपटीसह राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १३,९६७.५० पर्यंत बंद झाला. भांडवली बाजारात सलग चौथा निर्देशांक सत्र ऱ्हास नोंदला गेला. तर या दरम्यान गुंतवणूकदारांची संपत्ती ८ लाख कोटी रुपयांनी कमी झाली.

निर्देशांक आपटीला निमित्त काय?

गुरुवारी भांडवली बाजारात महिन्यातील वायदापूर्तीचे अखेरचे व्यवहार होणार आहेत. तर शुक्रवारच्या व्यवहारानंतर थेट सोमवारी, अर्थसंकल्प जाहीर होण्याच्या तारखेला सत्र होणार आहे. जागतिक बाजारातील घसरण, कंपन्यांचे संमिश्र तिमाही निकाल आणि गुंतवणूकदारांची नफावसुली यामुळे घसरण झाली. अर्थसंकल्पासंदर्भातील संभ्रमामुळे गुंतवणुकदारांकडून खरेदीऐवजी विक्रीला प्राधान्य दिलं जात असल्याने शेअर बाजारातील नकारात्कम ट्रेण्ड पहायला मिळत आहे. हा ट्रेण्ड सरकारकडून अर्थसंकल्पामधून फारसं काही सकारात्कम मिळण्याची अपेक्षा नसल्याचं दर्शवत असल्याचं काही जणाकार सांगतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments