महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते, पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत, असे खळबळजनक वक्तव्य श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी अमरावतीतील कार्यक्रमात केले आहे. वादग्रस्त वक्तव्यामुळे यापूर्वीही ते अनेकवेळा चर्चेत आले आहेत. बडनेरा मार्गावरील जय भारत मंगलम येथे गुरुवारी रात्री संभाजी भिडे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
भिडे म्हणाले, मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले, त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले असल्याचे सबळ पुरावे उपलब्ध असल्याचा दावाही यावेळी संभाजी भिडे यांनी केला.
देशामध्ये सर्वधर्मसमभावाचा उपदेश नकोच. अशा प्रकारचा उपदेश देणाऱ्या नेत्यांना राजकारणातून हद्दपार करावे, असे आवाहन संभाजी भिडे यांनी केले. हिंदुस्थान हा जगाच्या पाठीवरील एकमात्र हिंदू बहुसंख्य देश आहे. हिंदूंचे शौर्य अफाट आहे. परंतु हिंदू स्वतःचा धर्म, कर्तव्य, जबाबदाऱ्या विसरला. हिंदुस्थानची फाळणी होऊन देश षंढ पुढाऱ्यांच्या हाती गेला आणि हिंदूंची व हिंदुस्थानची अधोगती झाली, असे ते म्हणाले.
कार्यक्रमापूर्वी भीम आर्मी, भीम ब्रिगेड आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळाजवळ भिडे यांच्या विरोधात आंदोलन केले. काही ठिकाणचे पोस्टरही फाडण्यात आले. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.