२८ नोव्हेंबर २०२०,
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 130 व्या पुण्यतिथीनिमित्त आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेकडून समता पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. यावेळी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांना महात्मा फुले समता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. एक लाख रुपये, मानपत्र, शाल-श्रीफळ आणि स्मृतीचिन्हं असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
महात्मा फुले यांचा वाडा सुख दु:खात, अडचणीच्या काळात काम करण्याचं बळ देणारा आहे. डॉ. तात्याराव लहाने यांनी लाखो लोकांना पुन्हा दृष्टी मिळवून दिलं आहे. महात्मा फुले यांनीही त्यांच्या काळात बहुजन समाजाला दृष्टी देण्याचं काम केलं. फक्त नजर असून चालत नाही, तुम्ही समाजासाठी काही काम करत नसाल तर त्या नजरेचा काही उपयोग होत नाही. त्यासाठी दृष्टी असावी लागते, असं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे.
‘इतर मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे. ओबीसी समाजाच्या उन्नतीसाठी उभारण्यात आलेल्या महाज्योतीसाठी तसेच, ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी, मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी आम्ही भरीव निधीची मागणी करणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यात मुले व मुलींसाठी वसतिगृह बांधण्यात यावे, इतर मगासवर्गीय समाजातील बांधवाना घरकुल मिळावं यासाठी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना यासह विविध योजनांची मागणी आपण केलेली आहे. तसेच नोकरी मध्ये असलेला मागासवर्गीय समाजाचा अनुशेष भरून काढण्यात यावा अशी आपली मागणी आहे. या सर्व मागण्या मान्य केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही’, असा विश्वास छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केला.
जीवनातील सर्वोच्च पुरस्कार- डॉ. लहाने
तात्याराव लहाने यांनी हा पुरस्कार स्वीकारताना मनस्वी आनंद होत असल्याची प्रतिक्रिया दिली. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा मिळलेला हा पुरस्कार मी ज्या बहुजन समाजातून येतो त्या बहुजन समाजातून मिळाला असून त्यांचा मला मनस्वी आनंद आहे. महात्मा फुले यांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार हा माझ्या जीवनातील सर्वोच्च पुरस्कार असल्याचे त्यांनी सांगीतले. ज्या लोकांवर किडनी प्रत्यारोपनाची शस्त्रक्रिया पार पडली, त्यांना बदलल्यानंतर १० ते बारा वर्षाचे आयुष्य मिळते. मात्र, मला आईने दिलेली किडनी आणि आजवर केलेल्या कामामुळे २५ वर्षाहून अधिक आयुष्य लाभले. या कामाबद्दल महात्मा फुले यांच्या नावाने पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार माझ्या आईला आणि उपचार केलेल्या रुग्णांना समर्पित करतो, असं मत डॉ. लहाने यांनी व्यक्त केलं.