Saturday, March 22, 2025
Homeताजी बातमीजेष्ठ साहित्यिक नामदेव कांबळे यांना राष्टपतीच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्राप्त…!

जेष्ठ साहित्यिक नामदेव कांबळे यांना राष्टपतीच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्राप्त…!

वाशिम येथील प्रसिद्ध साहित्यिक, कवी, ना.चं. या नावाने ओळखले जाणारे नामदेव चंद्रभान कांबळे यांना ८ नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला या बरोबरच विदर्भाचे साहित्य क्षेत्र देशाच्या नकाशावर झळकले.

१ जानेवारी १९४८ रोजी शिरपूर (ता. मालेगाव) येथे ना.चं. कांबळे यांचा जन्म झाला. चार भाऊ व तीन बहिणी यामध्ये ना.चं. यांचा सहावा क्रमांक लागतो. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण शिरपूर येथे झाले तर बारावीनंतर वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएसला प्रवेश मिळाल्यानंतर प्रथम वर्षातच त्यांना अपयश आले. या नैराश्येतून साहित्य क्षेत्राकडे वळलेले ना.चं. कांबळे यांनी त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. उदरनिर्वाहासाठी चौकीदार, खासगी शाळेत वॉचमन अशी कामेही त्यांनी केली. बी.ए., बी.एड. शिक्षण झालेले असल्याने १९७७ मध्ये वाशिम येथील राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. दरम्यान, कादंबरी, कविता, साहित्य लिखाण सुरूच ठेवले. ‘राघववेळ’ ही त्यांची सर्वात गाजलेली कादंबरी. याच कादंबरीला १९९५ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. याच कादंबरीला ह.ना. आपटे, बा.सी. मर्ढेकर व ग.त्र्यं. माडखोलकर पारितोषिकही मिळाले आहे. आठ कादंबऱ्या, तीन कथासंग्रह, चार कवितासंग्रह, ललित लेख असे साहित्य क्षेत्रातील विविध पैलू हाताळत ना.चं. यांनी विविध पुरस्कार खेचून आणले. साहित्य क्षेत्रातील या कामगिरीची दखल घेत २५ जानेवारी रोजी त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला होता आणि ८ नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्राप्त झाला. या पुरस्काराने साहित्य जगतात मानाचा तुरा खोवला असून, ना.चं. कांबळे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

ना.चं. कांबळे यांचा अल्प परिचय
जन्म नाव : नामदेव चंद्रभान कांबळे
टोपण नाव : ना.चं.
जन्म : १ जानेवारी १९४८

जन्मस्थळ : शिरपूर, ता. मालेगाव, जि. वाशीम
कार्यक्षेत्र : शिक्षक, साहित्यकार, समाजसेवक

यापूर्वी मिळालेले पुरस्कार
साहित्य अकादमी पुरस्कार १९९५ – ‘राघववेळ’साठी
ह.ना. आपटे पारितोषिक – ‘राघववेळ’साठी

बा.सी. मर्ढेकर पारितोषिक – ‘राघव वेळ’साठी
ग.त्र्यं. माडखोलकर पारितोषिक -‘राघववेळ’साठी

वि.स. खांडेकर पारितोषिक १९९८ – ‘ऊन सावली’साठी

विविध संस्थांचे पुरस्कार- ‘राघववेळ’, ‘ऊन सावली’, ‘सांजरंग’, ‘मोराचे पाय’, ‘कृष्णार्पण’
राघववेळचा बंगाली अनुवाद- ‘रघबेर दिनरात’ (२००९) मध्ये प्रकाशित -तिला २०११-१२ चा साहित्य अकादमी

राज्य पुरस्कार ‘राघववेळ’(१९९४), ‘ऊन सावली’(१९९६)

वैयक्तिक पुरस्कार- संत गाडगे बाबा समरसता पुरस्कार, सामाजिक एकता पुरस्कार, अण्णा भाऊ साठे पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार २०१८.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments